Dhananjay Munde: परळी येथे आयोजित 'महापशुधन एक्स्पो'च्या भव्य व्यासपीठावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुक्तकंठाने स्तुती केली. "आमच्या दृष्टीने तुम्हीच 'कामधेनू' आहात, कारण आमच्या मनातील इच्छा केवळ तुम्हीच पूर्ण करू शकता," अशा शब्दांत मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. मुंडेंच्या या विधानामुळे आणि त्यांनी मांडलेल्या मागण्यांच्या पाढ्यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आले असून, यामागे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत दडले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
परळीच्या विकासासाठी 100 कोटींचा प्रस्ताव आणि मागण्यांचा पाढा
आपल्या स्वागत भाषणात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांसमोर विकासाचे अनेक प्रस्ताव ठेवले. यामध्ये प्रामुख्याने परळी वैजनाथ तीर्थक्षेत्राच्या जिर्णोद्धारासाठी आगामी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच केंद्राच्या 'प्रसाद' योजनेत ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवणे आणि त्यासाठी 5 कोटींचा प्राथमिक निधी त्वरित उपलब्ध करून देण्याची विनंती केली. सिंचन प्रकल्पांचा प्रश्न मार्गी लावताना, रखडलेल्या 11 पैकी 9 प्रकल्पांना पाण्याची उपलब्धता करून देण्याचे आवाहनही त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून फडणवीसांना केले.
'कामधेनू' आणि मुंडेंच्या मनातील 'ती' इच्छा
मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेली 'कामधेनू'ची उपमा विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. "मुख्यमंत्री कामधेनू असल्याने त्यांना आमच्या मनातील इच्छा ठाऊक आहेत," असे सूचक विधान करत मुंडेंनी राजकीय सस्पेन्स निर्माण केला. राजकीय विश्लेषकांच्या मते, या विधानाचा थेट संबंध त्यांच्या रखडलेल्या मंत्रिपदाशी आहे. संतोष देशमुख प्रकरणाच्या दबावामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता परिस्थिती निवळत असताना, पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी मुंडे 'फिल्डिंग' लावत असल्याची चर्चा परळीत रंगली आहे.
संतोष देशमुख प्रकरणाची पार्श्वभूमी आणि राजकीय अडचण
धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधली असली, तरी त्यांच्यावर अद्याप संतोष देशमुख प्रकरणाची सावली कायम आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक अण्णा कराड सध्या तुरुंगात आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना आणि जनसामान्यांमध्ये रोष कायम असताना, मुख्यमंत्री धनंजय मुंडेंची 'मनातील इच्छा' पूर्ण करून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - Rahul Narvekar Video : राऊतांचा आरोप ठरला फोल, हा तर दोन स्थानिकांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न; नार्वेकरांच्या व्हिडीओवर स्थानिक म्हणाले की...
पुनरागमन की केवळ विकास? चर्चेला उधाण
धनंजय मुंडे यांनी या सोहळ्याच्या माध्यमातून आपली शक्तीप्रदर्शनासोबतच मुख्यमंत्र्यांशी असलेले सलोख्याचे संबंध जगाला दाखवून दिले आहेत. त्यांनी मांडलेला हा केवळ विकासाचा अजेंडा आहे की आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी रचलेली ही रणनीती आहे, यावर आता राजकीय गोटात तर्कवितर्क लढवले जात आहेत.