चिपळूण (प्रतिनिधी. योगेश बांडागळे): मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे केंद्र असलेल्या चिपळूण शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचे हायटेक रूपांतर करण्याचा प्रकल्प गेल्या नऊ वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडला असून, या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यामुळे रखडलेल्या कामाला गती मिळणार का, याकडे चिपळूणकरांसह प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
चिपळूण हे मुंबई आणि गोवा या दोन महत्त्वाच्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, कोकणातील प्रमुख व्यापारी आणि वाहतूक केंद्र म्हणून ओळखले जाते. एकेकाळी शहराच्या मध्यभागी असलेले एसटी बस स्थानक प्रवाशांनी गजबजलेले असायचे. मात्र कालांतराने या बस स्थानकाची इमारत जीर्ण झाल्याने शिवाजीनगर येथे नवीन बस स्थानक उभारण्यात आले. त्यामुळे मध्यवर्ती बस स्थानक अपुरे पडू लागले, तरी शहराच्या मध्यभागी असल्याने आजही या स्थानकाचे महत्त्व कायम आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने २०१८मध्ये या बस स्थानकाचे हायटेक बस स्थानकात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. प्रकल्पासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आणि कामालाही सुरुवात झाली. मात्र त्यानंतर निधीअभावी काम वारंवार रखडत गेले. दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात या प्रकल्पासाठी उपलब्ध असलेला निधी आरोग्यविषयक उपाययोजनांसाठी वळविण्यात आल्याने काम पूर्णपणे ठप्प झाले.
काम रखडल्यामुळे उभारण्यात आलेल्या संरचनांभोवती गवताचे जंगल वाढले आणि प्रकल्पाचे स्वरूप अर्धवट अवस्थेतच राहिले. या प्रश्नावर अनेक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला. शिवसेना नेते संदीप सावंत यांनी आंदोलन छेडले, तर माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन काम पूर्ण करण्याची मागणी केली. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनीही आगाराची पाहणी करून संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला. दरम्यान, आमदार शेखर निकम यांनी या विषयावर विशेष लक्ष केंद्रित केले. २०२४च्या अधिवेशनात त्यांनी लक्षवेधी सूचना मांडत हा प्रश्न राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर कामाला काही प्रमाणात गती मिळाली असून सध्या इमारतीच्या वरच्या मजल्याचे काम सुरू आहे. मात्र अद्याप संपूर्ण प्रकल्प पूर्ण झालेला नाही.
या प्रकरणी चिपळूणचे सुपुत्र ॲड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने परिवहन विभागाला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात काम अद्याप संथ गतीने सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक करणार पाहाणी:
सध्या बस स्थानकाचा कारभार तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमधून चालविला जात आहे. उन्हाळ्यात प्रवाशांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो, तर पावसाळ्यात छत्रीचा आधार घेत बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीमध्ये मोठी भर पडत आहे. आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणार असल्याने रखडलेल्या कामासाठी आवश्यक निधी मंजूर होणार का आणि प्रकल्प पूर्णत्वाकडे जाणार का, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रकल्पासाठी आणखी २.६० कोटींची गरज :
हायटेक बस स्थानक प्रकल्पासाठी सुरुवातीला सुमारे ५.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. काम रखडल्यानंतर ठेकेदार बदलण्यात आला आणि उर्वरित २.८७ कोटी रुपयांच्या कामाची निविदा मकुभाई असोसिएट्स यांना देण्यात आली. सध्या कामाला गती देण्यात आली असून, एसटी बस उभ्या राहणार असलेल्या शेडचे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे. मात्र संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी २.६० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे, अशी माहिती मकुभाई असोसिएट्सचे तेजस शिंदे यांनी दिली.