अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुण्यातील वडकी परिसरातील मेसर्स सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड या कंपनीविरोधात मोठी कारवाई करत तिचा औषध विक्री परवाना रद्द केला आहे. तपासणीदरम्यान औषध साठवणूक, नोंदींचे व्यवस्थापन आणि लेबलिंगशी संबंधित गंभीर नियमभंग आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला.एफडीएच्या पथकाने जून २०२६ मध्ये कंपनीच्या मुख्य गोदामाची तपासणी केली होती. या तपासणीत अनेक अनियमितता समोर आल्या. औषधांचा साठा नियमानुसार न ठेवता थेट जमिनीवर ठेवण्यात आल्याचे दिसून आले. तसेच खरेदी-विक्रीच्या नोंदी आणि प्रत्यक्ष गोदामातील साठा यामध्ये तफावत आढळली. मुदतबाह्य औषधांच्या विल्हेवाटीबाबतही आवश्यक नियमांचे पालन न झाल्याचे निरीक्षण करण्यात आले.
तपासणीतील सर्वात गंभीर बाब म्हणजे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करता येत नसलेल्या शेड्यूल एच औषधांच्या पॅकिंगवर त्यांचा प्रचारात्मक मजकूर छापण्यात आल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे नागरिक डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे खरेदी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात, अशी चिंता एफडीएने व्यक्त केली आहे.एफडीएच्या म्हणण्यानुसार, औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, १९४० आणि त्याअंतर्गत असलेल्या १९४५ च्या नियमांनुसार अशा प्रकारची जाहिरात आणि लेबलिंग कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.