PM Modi Photo Controversy: पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या घटनेवरून आता मनसे आणि भाजपमधील राजकीय संघर्ष पेटला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसैनिकांनी मुख्याध्यापकांच्या दालनातील मोदींचे छायाचित्र हटवल्यानंतर या वादाचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले आहेत. या प्रकरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानाबाहेर आंदोलनाची हाक दिली. या इशाऱ्यामुळे मनसे कार्यकर्तेही प्रचंड आक्रमक झाले असून, त्यांनी दादर आणि माहिम परिसरात मोठी फिल्डिंग लावत भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली आहे.
माहिममध्ये दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने
भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते माहिम परिसरात दाखल होताच त्यांनी अमित ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. "पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही," असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला. त्याच वेळी मनसे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि गजानन काळे यांच्यासह शेकडो मनसैनिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी भाजपच्या आंदोलनाला चोख प्रत्युत्तर देत शिवतीर्थाकडे येणाऱ्या मार्गांवर ठिय्या मांडला. दोन्ही बाजूंच्या आक्रमक पवित्र्यामुळे माहिम आणि दादर भागात काही काळ प्रचंड गोंधळाची आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
'शिवतीर्था'भोवती पोलीस छावणीचे स्वरूप
कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत राज ठाकरे यांच्या निवासाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. 'शिवतीर्थ'कडे जाणारे मार्ग बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले असून, वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
पुण्यातील घटनेतून वादाची ठिणगी; अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
या संपूर्ण संघर्षाची सुरुवात पुण्यात झाली होती. शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील समस्यांची पाहणी करण्यासाठी गेले असता, अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे शेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी तो फोटो हटवला. या प्रकरणी अमित ठाकरेंसह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुण्यातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. या कारवाईनंतर आता मुंबईतील राजकीय रणकंदन अधिकच तीव्र झाले आहे.