मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधान परिषदेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपालांनी भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
छगन भुजबळ यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र भुजबळ धनंजय मुंडे यांचे खाते मिळणार असल्याची राजकीय चर्चा सुरु आहे. त्यातच मंत्रालयात धनंजय मुंडेंच्या दालनाची सफाई सुरु आहे. त्यामुळे मुंडेंचं दालनच भुजबळांना मिळण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा : मंत्रिमंडळाच्या बैठकीत खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकरांना श्रद्धांजली अर्पण
मंत्रालयात माजी मंंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनाचे काम सध्या सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दालनाची सफाई करण्यात आली असून सुशोभीकरण करण्यात येत आहे. सध्या दालनात कर्मचारी वर्ग नसून काही काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही. पक्षाने त्यांना डावलल्याने भुजबळांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. अखेर आता सहा महिन्यानंतर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. काही दिवसांआधीच धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता छगन भुजबळ यांना संधी मिळाली. त्यामुळे मुंडेंकडे असलेले खाते भुजबळांना मिळणार असल्याच्या चर्चा आहेत.
भुजबळांचा राजकीय प्रवास
15 ऑक्टोबर 1947 ला छगन भुजबळांचा नाशिकमध्ये जन्म झाला. मुंबईतील व्हीजेटीआयमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी त्यांनी घेतली. त्यांनी शाहू, फुले आंबेडकरांचे विचार मांडत 1 नोव्हेंबर 1992 साली समता परिषदेची स्थापना केली. 1973 मध्ये मुंबई महापालिकेवर निवड झाल्यानंतर राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. 1973 ते 1984 मध्ये महापालिकेत विरोधी पक्षनेता होते. त्यानंतर 1985 मध्ये मुंबईचे महापौर म्हणून काम पाहिलं आणि 1991 मध्ये दुसऱ्यांदा महापौर झाले. 1985 ते 1990 अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड झाली. नोव्हेंबर 1991 मध्ये महसूलमंत्री तर 1995 मध्ये गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. एप्रिल 1996 मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिलं आहे. एप्रिल 2002 ते 23 डिसेंबर 2003 या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणूनही काम केले. 2004मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड झाली. नोव्हेंबर 2004 ते 3 डिसेंबर 2008 या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री होते. 8 डिसेंबर 2008 ला उपमुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. 2009 मध्ये दुसऱ्यांदा तर 2014 मध्ये तिसऱ्यांदा आणि 2019मध्ये सलग चौथ्यांदा येवल्यातून विधानसभेवर निवड झाली. महाविकास आघाडीच्या काळात 28 नोव्हेंबर 2019 ला अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रिपदी होते. महायुतीमध्ये सहभागी होऊन 2 जुलै 2023 पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रिपदी वर्णी लागली. तर 23 नोव्हेंबर 2024 पाचव्यांदा येवला विधानसभा मतदासंघातून आमदार म्हणून निवडून आले.