नाशिक: नाशिक शहरात गेल्या काही आठवड्यांपासून सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस)चा तीव्र तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या 50% हून अधिक सीएनजी पंप बंद अवस्थेत असून, ग्राहकांना बराच वेळ रांगेत उभं राहूनही गॅस मिळत नाही.
नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनने (NDPDWA) महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL)कडे वेळोवेळी तक्रारी करूनही पुरवठ्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे असोसिएशनने 8 दिवसांची मुदत देत 26 एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व सीएनजी विक्री बंद करण्याचा इशारा दिला आहे.
सीएनजीचा पुरवठा नाशिकजवळील विल्होळी येथील MNGLच्या प्रकल्पातून केला जातो. येथे एलएनजी (लिक्विफाईड नॅचरल गॅस)चे सीएनजीमध्ये रूपांतर करून टँकरद्वारे पंपांना पुरवठा केला जातो. मात्र गेल्या 3-4 आठवड्यांपासून हा पुरवठा अत्यंत अपुरा व अनियमित झाल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी सांगितले. आम्ही MNGLकडे किमान 10 तास सीएनजी पुरवठ्याची मागणी केली होती, पण त्यावर कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही, असे ठाकरे म्हणाले.
हेही वाचा: कोपरगावात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; एकाच दिवशी १७ जणांना चावा
नाशिक जिल्ह्यात सुमारे 50 सीएनजी पंप असून, त्यापैकी 15 शहरात आहेत. सध्या प्रत्येक पंपाला किमान 6 टँकरची गरज असताना फक्त 1 ते 2 टँकरच मिळत आहेत. त्यामुळे पंप अवघ्या 1-2 तासांत बंद होतात, अशी माहिती उपाध्यक्ष तहसीन खान यांनी दिली. माझा सीएनजी पंप सकाळीच बंद झाला. लोक रांगेत बराच वेळ उभे राहूनही निराश होऊन परत जातात. अशा वेळी ग्राहकांना समजावणे खूप कठीण होते. त्यामुळे आम्ही MNGLला स्पष्टपणे सांगितले आहे की, जर पुरवठा सुरळीत केला नाही, तर विक्री थांबवावी लागेल,” असे खान म्हणाले.
दरम्यान, MNGLच्या अधिकाऱ्यांनी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले असून, लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा दावा त्यांनी केला आहे.