Pune Ring Road: पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पूर्व भागातील कामात हलगर्जीपणा करणाऱ्या बड्या कंत्राटदार कंपनीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) जोरदार झटका दिला आहे. चाकण आणि तळेगाव पट्ट्यातील कामाला तब्बल 3 महिने विलंब झाल्याने, "तुमच्यावर दररोज 1.25 कोटी रुपयांचा दंड का आकारू नये?" अशा कडक शब्दांत MSRDC ने कंपनीला 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे संबंधित कंत्राटदार कंपनीच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून प्रकल्पाच्या संथ गतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पश्चिमेला वेग, पूर्वेला ब्रेक
रिंग रोडचे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन स्वतंत्र विभागांत विभागले गेले आहे. मात्र, सध्या या दोन्ही विभागांच्या प्रगतीत मोठी तफावत दिसून येत आहे. पश्चिम विभागातील कामाचा वेग समाधानकारक असून तेथे सुमारे 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. विशेषतः कल्याण जवळील दुहेरी बोगद्याचे काम वेगाने सुरू असून, दोन्ही बाजूंची मिळून 2.8 किमीहून अधिक खोदाई पूर्ण झाली आहे. याउलट, पूर्व विभागातील कामाची प्रगती केवळ 12 ते 15 टक्क्यांवर रेंगाळली आहे. यातही पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या चाकण-तळेगाव परिसरातील काम कमालीचे संथ असल्याचे समोर आले आहे.
नोटीस आणि कारवाईचा इशारा
ज्या कंपनीने पूर्वेकडील पहिला व तिसरा टप्पा आणि पश्चिमेकडील पहिल्या टप्प्याचे कंत्राट घेतले आहे, त्याच कंपनीच्या कामावर महामंडळाने ताशेरे ओढले आहेत. निर्धारित वेळापत्रकापेक्षा काम 3 महिने मागे असल्याने महामंडळाने कडक पावले उचलली आहेत. जर कामात तातडीने सुधारणा झाली नाही, तर दररोज 1 कोटी 25 लाख रुपये दंड आकारण्याची तयारी MSRDC ने दर्शवली आहे. या विलंबाबाबत कंपनीकडून तातडीने स्पष्टीकरण आणि खुलासा मागवण्यात आला आहे.
बोगद्याचे काम प्रगतीपथावर
एकीकडे सपाटीवरील रस्त्यांच्या कामात अडथळे येत असताना, पश्चिम विभागातील चौथ्या टप्प्यात असलेल्या बोगद्याचे काम मात्र वेगाने सुरू आहे. या बोगद्याच्या खोदाईनंतरच्या 'शॉर्ट किट' मारण्याच्या प्रक्रियेला सध्या गती देण्यात आली असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्पाची 'डेडलाईन' गाठण्यासाठी आता MSRDC ने कठोर भूमिका घेतल्याने संबंधित कंत्राटदाराला कामाचा वेग वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.