देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. देशात दररोज कोरोनाच्या सक्रीय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना परिस्थितीला तोंड देण्यासाठी सोमवार आणि मंगळवार रोजी देशात कोरोना मॉकड्रील घेण्यात येणार आहे. आरोग्य विभाग आणि कर्मचाऱ्यांच्या सज्जतेची चाचणी करणे तसेच रुग्णालयातील पायाभूत सुविधांच्या स्थितीचा आढावा घेणे, हा कोरोना मॉकड्रीलचा मुख्य उद्देश आहे.
देशभरात कोरोना परिस्थितीच्या तयारीचा आढवा घेण्यासाठी १० आणि ११ एप्रिल रोजी कोरोना मॉकड्रील केले जाणार आहे. या मॉकड्रील दरम्यान, शासकीय आणि खासगी रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे. रुग्णालयातील आरोग्यसेवेची गुणवत्ता आणि ऑक्सिजन पुरवठ्याची चाचपणी मॉकड्रील अंतर्गत होणार आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं, मुबलक कर्मचाऱ्यांची संख्या आणि रुग्णालयातील गरजेच्या वस्तूंची खात्री करण्यात येणार आहे.
मुंबईत सकाळी ११ वा. जे.जे. रुग्णालयात, दुपारी १२वा. सेंट जॉर्ज रुग्णालयात आणि दुपारी १ वा. बॉम्बे रुग्णालयात कोरोना मॉकड्रील होणार आहे. तर, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हे मॉकड्रीलची पाहणी करण्यासाठी झज्जरच्या एम्स रुग्णालयात उपस्थित राहणार आहेत.
रविवारी मागील २४ तासांत देशात ५ हजार ३५७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, एकट्या केरळमध्ये २४ तासांत १ हजार ८०१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील रुग्णांची संख्या ३२ हजार ८१४वर पोहचली आहे.