'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेते सतीश नायकोडे यांच्यासोबत मोठी फसवणूक झाली आहे. मुंबईत घर देण्याच्या बहाण्याने तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांताक्रुझ येथील एसआरए प्रकल्पात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून 'आस्था प्रॉपर्टीज'ने त्यांच्याकडून ही रक्कम उकळली. 'क्राइम पेट्रोल' या शोमध्ये सत्य घटनांवर आधारित एपिसोड दाखवले जातात. अनेकदा या एपिसोडमधून प्रेक्षक सावध होतात. याच क्राइम पेट्रोल मालिकेतील अभिनेता या ट्रॅपमध्ये अडकला आहे. आपली फसवणूक झाली असल्याचं कळताच, सतीश नायकोडे हे मागील वर्षभरापासून न्यायासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवतायेत. पण त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. या काळात त्यांना आपल्या वडिलांनाही गमवावं लागलं. दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना नवीन घर घेण्यासाठी त्यांनी डोंबिवली येथील वडिलांचं घर गहाण ठेवलं होतं. मात्र फसवणूक झाल्याने त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत मनातली तळमळ व्यक्त केली. काय उरलं आयुष्यात आता? वय वर्ष पन्नास झालं. परत कसं उभं राहायचं? असं म्हणत ते हतबल झाले आहेत.
सतीश नायकोडे म्हणाले, "घर घेण्याचं स्वप्न बाळगलं होतं, त्यासाठी वडिलांचं डोंबिवलीतलं घर एका प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवलं होतं. ते पैसे मी आस्था प्रॉपर्टीजच्या माध्यमातून घर घेण्यासाठी गुंतवले. तिथे असणारे सच्चिदानंद बामणे, अँग्नल परेरा, आकाश सोनी… सगळ्यांत यांचा मास्टरमाईंड म्हणजे शैलेश काकण. त्याचबरोबर त्यांचे दोन साथीदार म्हणजे अभिषेक गुजर आणि रुपेश बेळमकर. ही सगळी टोळी आहे आणि यांच्यावर नक्कीच कुणाचा तरी वरदहस्त आहे."
"डोंबिवलीत राहून कामं मिळवणं, हे तसं खूप कठीण जायचं. अनेक प्रॉडक्शन हाऊस म्हणायचे की, 'सर, तुम्ही वेस्टर्न लाईनला जर शिफ्ट झालात तर आमचा हा नवीन एक प्रोजेक्ट येतोय, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला नक्की काम देऊ. फक्त तुमच्या ट्रॅव्हलिंगच्या डिस्टन्समुळे तुम्ही कितपत वेळ देऊ शकाल? याची शाश्वती वाटत नाही' म्हणून कामं थोडी कमी व्हायला लागली आणि खरंच कमी झाली कामं."
सतीश नायकोडे पुढे म्हणाले, "प्रत्येक प्रामाणिक माणसाला एक आशा असते की, बाबा माझं स्वतःचं, माझ्या मेहनतीचं, स्वतःचं हक्काचं घर असावं. वडिलोपार्जित तर आहेच, पण मी काय कमावलं मुंबईत येऊन? तर एक छोटंसं घर घेऊया. हे एक स्वप्न होतं. साधं स्वप्न होतं. वडिलोपार्जित घर आहेच आहे डोंबिवलीमध्ये. पण स्वतःचं घर घ्यावं, ही एक खूप मोठी प्रबळ इच्छा होती आणि म्हणून मी वेस्टर्न लाईनला घर शोधत होतो."
"काही ठिकाणी बजेटमध्ये बसत नव्हतं, काही ठिकाणी अनेक वेगवेगळ्या अडचणी होत्या. अशा वेळेला एक सच्चिदानंद भामरे नावाचा माणूस भेटला. त्याने एक घर दाखवलं. बैठ्या घरात चाळींमध्ये होतं. मराठी लोकं होती. लोकॅलिटी चांगली होती आणि मला योग्य वाटलं. बजेटमध्ये वाटत होतं आणि म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवला. त्याने कागदपत्रं दाखवली सगळी आणि कागदपत्रं ओके होती. त्यांनी ज्यांच्याशी ओळख करून दिली ती माणसंही ओके वाटली. मग सगळं ओके दिसत असताना आता मागे का हटायचं? की ज्याच्यासाठी आपण एवढा प्रयत्न केला 12-13 वर्ष, पश्चिम उपनगरात घर शोधतोय, आता आपल्याला आपल्या मनासारखं घर, आपल्या बजेटमधलं घर मिळतंय, मग का मागे हटायचं? आणि म्हणून मग मी त्यांना पैसे दिले."
"2018 मध्ये मी वडिलोपार्जित मालमत्ता गहाण ठेवून खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं आणि त्यातील 24.5 लाख रुपये संबंधितांना दिले. हा संपूर्ण व्यवहार अधिकृत पद्धतीने झाला असून त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. सुरुवातीला दरमहा 45 हजार, तर सध्या 42,700 रुपयांचा हप्ता भरत आहे. गेल्या साडेआठ वर्षांत मी जवळपास 45 लाख रुपये बँकेला भरले आहेत. तरीही कर्ज फेडण्यासाठी आणखी 30 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. घराच्या स्वप्नासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे माझ्यावर प्रचंड आर्थिक ओझं आलं आहे. काय उरलं आयुष्यात आता? वय वर्ष पन्नास झालंय. परत कसं उभं राहायचं?"