Viral Video: मुंबईतील घाटकोपर परिसरात एका फरसाण दुकानात घडलेली घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. एका ग्राहकाने दुकानात काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील युवकाला केवळ मराठी न बोलल्यामुळे धमकावले आणि दुकान बंद करण्याची धमकी दिली. यावर संबंधित युवकाने संयम राखत उत्तर दिले आणि ही प्रतिक्रिया व्हिडिओच्या माध्यमातून सध्या सर्वत्र गाजत आहे.
व्हिडिओमध्ये ग्राहक कर्मचाऱ्याला म्हणताना दिसतो 'मराठी शिका, नाहीतर दुकान बंद करा.' कर्मचारी शांतपणे उत्तर देतो 'मी यूपीहून आलोय, एक-दोन दिवसांत मराठी शिकणं शक्य नाही, त्याला वेळ लागतो.' या उत्तराने ग्राहक अजूनच भडकतो आणि 'तुला इतका मारेल' असे धमकीने सांगतो. मात्र, कर्मचाऱ्याने पुन्हा शांतपणे संवाद साधत परिस्थिती हाताळली.
या व्हिडिओमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध इतर भाषिक असा वाद उफाळून आला आहे. अनेकांनी ग्राहकाच्या वागणुकीचा निषेध केला असून, भाषेची सक्ती करणे आणि धमकी देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. काहींनी मात्र मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून समर्थन केले आहे. 'महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकावीच लागेल,' असे काहींचे म्हणणे आहे, तर इतरांनी 'भाषा शिकणे ही वैयक्तिक निवड असते, ती दबावाने लादता येत नाही' असा युक्तिवाद केला आहे.
ही घटना काही नवीन नाही. याआधीही डोमिनोज डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकामध्ये मराठी न बोलल्यामुळे वाद झाला होता. अशाच प्रकारचा कन्नड भाषेवरून झालेला वादही सोशल मीडियावर गाजला होता.
भाषा माणसांमध्ये संवाद साधण्याचं माध्यम असावं, तणावाचं नाही. अशा घटनांमुळे भाषेच्या नावाखाली विभाजन होतंय का, हा चिंतेचा विषय बनला आहे.