मुंबई: मुंबईमधील प्रवाशांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या दादर रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. फलाटांवर होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी विभागण्यासाठी पश्चिम रेल्वेने दादर स्थानकात ‘डेक’ (Elevated Deck) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बोरिवली आणि खार स्थानकाच्या धर्तीवर हा डेक तयार करण्यात येणार असून, यामुळे प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाणे आणि स्थानकाबाहेर पडणे अधिक सोपे होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (DRM) पंकज सिंह यांनी दिली.
‘वर्ल्ड क्लास’ सुविधांवर भर
भारत मर्चंट्स चेंबरच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंकज सिंह बोलत होते. यावेळी चेंबरचे अध्यक्ष मनोज जालान यांनी मुंबईतील रेल्वे स्थानके आणि सेवा ‘वर्ल्ड क्लास’ करण्याची मागणी केली. विशेषतः मरिन लाईन्स, चर्नी रोड आणि ग्रँट रोड यांसारख्या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, मरिन लाईन्स स्थानकावर सुविधांच्या विस्ताराचे काम वेगाने सुरू असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.
एसी लोकलच्या संख्येत होणार वाढ
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नुकतीच एक नवीन एसी लोकल दाखल झाली आहे. सध्या या गाडीची तांत्रिक चाचणी सुरू असून, ती यशस्वी झाल्यानंतर मुंबईत दररोज नवीन एसी लोकल सेवा सुरू केल्या जातील. वाढत्या उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी प्रवाशांकडून एसी लोकलची मागणी सातत्याने होत आहे; त्यादृष्टीने हे रेल्वेचे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
बुलेट ट्रेन आणि पायाभूत सुविधांचा वेग
पंकज सिंह यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही आढावा घेतला. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेवर होणारा खर्च हा निव्वळ खर्च नसून, तो अर्थव्यवस्थेला 4 ते 5 पटीने गती देणारी गुंतवणूक आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. रेल्वेच्या या विकासकामांमुळे मुंबईतील उपनगरीय प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार आहे.
व्यापारी वर्गाला मिळणार दिलासा
काळबादेवी आणि आसपासच्या परिसरातील व्यापारी दररोज रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. दक्षिण मुंबईतील स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि आधुनिक डेकची सुविधा झाल्यास व्यापाराला मोठी चालना मिळेल दादरमधील या प्रस्तावित डेकमुळे पीक अवरमध्ये होणारी चेंगराचेंगरी थांबण्यास मदत होईल, अशी आशा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.