Ladki Bahin Yojna: राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'बाबत रक्षाबंधनापूर्वीच मोठा वाद निर्माण झाला आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेदरम्यान अपात्र महिलांची नावे वगळताना काही पात्र लाभार्थ्यांचेही 1,500 चे हप्ते अचानक थांबल्याचे समोर आले आहे. महालेखापाल (CAG) च्या अहवालात योजनेमध्ये 3,500 कोटींच्या आर्थिक अनिमिततेवर बोट ठेवल्यानंतर प्रशासनाकडून जवळपास 92 लाख महिलांच्या खात्यांची कसून पडताळणी सुरू झाली आहे. मात्र, यामुळे गेल्या 3 महिन्यांपासून खात्यात पैसे जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या योजनेतील त्रुटी अकोल्यातील मारुती नगर येथील उदाहरणांवरून स्पष्टपणे दिसून येत आहेत. तेथील संगीता गेडाम यांना नियमितपणे दरमहा 1,500 मिळत असून, त्यातून त्यांच्या दैनंदिन घर खर्चाला मदत होत आहे. परंतु, सरकारने आश्वासित केलेला 2,100 चा वाढीव हप्ता अद्याप मिळालेला नसल्याची तक्रार त्यांनी केली. तर दुसरीकडे, पूनम कौसतर यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांचा हप्ता गेल्या 3 महिन्यांपासून बंद झाला आहे. बँक आणि संबंधित विभागाकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने गॅस सिलेंडर आणि मुलांच्या शिक्षण खर्चाचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरल्यानंतरही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ; राधानगरी धरण 80 टक्के भरले
दरम्यान, या गोंधळावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही पात्र महिलेचा हप्ता कायमचा बंद केला जाणार नसून, सध्या सुरू असलेले सर्वेक्षण हे केवळ अपात्र आणि बोगस लाभार्थी शोधण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सर्व पात्र महिलांच्या खात्यात थकीत रक्कमेसह पैसे पुन्हा जमा केले जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे आता या तांत्रिक पडताळणीनंतर नेमक्या किती पात्र महिलांना पुन्हा लाभ मिळतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे