पंढरपूर : पंढरपूर येथील विठ्ठल – रुक्मिणी मंदिर प्रशासनाकडून भाविकांकरता महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर येत्या 23 ते 25 सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात मंदिरातील विठ्ठल मूर्तीवर पुरातत्त्व विभागाकडून संवर्धित लेपन प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे 23 ते 25 सप्टेंबर या तीन दिवसांत भाविकांना श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे मुखदर्शन तसेच पदस्पर्श दर्शन अशा दोन्ही सुविधा बंद राहणार आहेत.
श्री विठ्ठलाच्या मूर्तीची लेपन प्रक्रिया गेल्या काही काळापासून रखडली होती. मात्र आता 23 ते 25 सप्टेंबरदरम्यान मूर्तीवर संवर्धित लेपण करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. ही लेपन प्रक्रिया जून महिन्यातच पार पडते. मात्र, मूर्तीवर रासायनिक लेपन करावे की आयुर्वेदिक लेपन करावे, यावरून वाद निर्माण होऊन प्रकरण न्यायालयात गेले होते. अखेर कोल्हापूर खंडपीठाच्या आदेशानुसार, पुरातत्त्व विभागाच्याच सल्ल्याने आणि देखरेखीत विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचे निश्चित झाले आहे.