MPSC Group C Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) शासकीय सेवेतील वर्ग-3 च्या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026' अंतर्गत भरावयाच्या एकूण 2,929 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेत वाढ करण्यात आली आहे. परीक्षार्थींकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण मागणीचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आता 20 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाईन स्वरूपात आपले अर्ज सादर करता येतील.
शुल्क भरण्यासाठी 23 ऑगस्टची मुदत
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा शुल्क जमा करण्याची मुदत 23 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आयोगाने बँक चलनाद्वारे पेमेंट करण्याची जुनी पद्धत आता पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे उमेदवारांना केवळ नेट बँकिंग, यूपीआय (UPI), क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड या डिजिटल माध्यमांचा वापर करूनच फी भरावी लागणार आहे. याशिवाय, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) या पदासाठी वयोमर्यादेची गणना करण्यासाठी 20 ऑगस्ट 2026 हीच पात्रता तारीख (Cut-off Date) मानली जाईल.
हेही वाचा – NEET-UG परीक्षेच्या रचनेत होणार अभूतपूर्व बदल? केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात नवीन आराखडा सादर
'पेसा' क्षेत्रातील तलाठी पदांसाठी विशेष अटी व नियम लागू
भरती प्रक्रियेत 'पेसा' (PESA) आणि 'बिगर पेसा' भागांतील आरक्षणाचे स्वरूप संबंधित जिल्ह्यांच्या मागणीपत्रानुसार ठरवण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रासाठी अनुसूचित जमाती (ST) घटकातील पदे राखीव असून, राज्य सरकारच्या निर्देशानुसार या आरक्षणात गरजेनुसार सुधारणा होऊ शकतात. पेसा अंतर्गत येणाऱ्या तलाठी पदाकरिता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी स्थानिक रहिवासी असण्यासोबतच इतर कायदेशीर अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे.