गडचिरोली : नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या एका जवानाचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झालाय. गडचिरोलीत नक्षलविरोधी मोहिमेवर असलेले धुळे एसआरपीएफ गट क्रमांक सहाचे जवान राहुल प्रभाकर शिनगारे (वय37) यांचा विषारी सर्पदंशाने मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल शिनगारे हे सध्या चामोर्शी तालुक्यातील रेगडी या परिसरात नक्षलविरोधी मोहिमेसाठी तैनात होते. कर्तव्यावर असताना ते अंघोळीसाठी गेले असता अचानक एका विषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला. हा प्रकार लक्षात येताच सहकारी जवानांनी तातडीने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दखल केले.
रुग्णालयात नेताच घडलं भयंकर
डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले. मात्र, विषाचा प्रभाव जास्त असल्याने उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. नक्षलवाद्यांच्या गोळीपासून बचाव करणाऱ्या या तरुण जवानाता सापाच्या दंशाने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर गडचिरोली पोलीस कवायत असलेल्या मैदानावर शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या उपस्थितीत राहुल शिनगारे यांना शासकीय इतमामात अंतिम मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शिनगारे यांचे पार्थिव मूळ गावी धुळे येथे रवाना करण्यात आले असून, त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.