दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मुंबई आणि पुणे येथून मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावी रवाना झाले आहेत. यामुळे बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी दिसत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ आणि रेल्वे प्रशासनाकडून अनेक जादा गाड्या चालवल्या जात आहेत. मात्र, पुणे–मराठवाडा मार्गावर अद्याप कोणतीही विशेष रेल्वे उपलब्ध नसल्याने या भागातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. अखेर रेल्वे विभागाने या मागणीची दखल घेत, दिवाळी सणानिमित्त नांदेड–हडपसर–नांदेड ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, या विशेष गाडीच्या सुरूवातीमुळे पुण्यातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या तसेच मराठवाड्यातून पुण्याकडे येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गाडीत एकूण 22 डबे असतील, ज्यामध्ये वातानुकूलित (AC), स्लीपर आणि जनरल वर्गाच्या बोगींचा समावेश आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता, रेल्वे प्रशासनाने ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून दिली असून, यामुळे हजारो प्रवाशांना लाभ होणार आहे.
हेही वाचा: Gondia: माजी खासदार महादेवराव शिवनकर यांनी घेतला अखेरचा श्वास, जाणून घ्या त्याचा राजकीय प्रवास
रेल्वे क्रमांक 07606 हुजूर साहिब नांदेड ते हडपसर विशेष गाडी 21 आणि 28 ऑक्टोबर रोजी (मंगळवार) धावणार आहे. ही गाडी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी नांदेड स्थानकावरून सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी शहर, कुडूवाडी आणि दौंड या स्थानकांवर थांबत रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी हडपसर (पुणे) येथे पोहोचेल.
त्याचप्रमाणे, परतीची गाडी क्रमांक 07608 हडपसर–हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी देखील 21 आणि 28 ऑक्टोबर रोजी हडपसर स्थानकावरून रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. ही गाडी दौंड, लातूर, परळी आणि परभणीमार्गे प्रवास करत दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी नांदेड येथे पोहोचेल.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही विशेष सेवा दिवाळी सणादरम्यान वाढलेल्या गर्दीचे व्यवस्थापन आणि प्रवाशांना सुलभ प्रवासाची सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. पुण्यात नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त राहणारे मराठवाड्यातील नागरिक प्रत्येक वर्षी दिवाळी सणासाठी गावी जातात. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
रेल्वे विभागाने प्रवाशांना सूचना दिल्या आहेत की तिकिटे केवळ IRCTC संकेतस्थळावरून किंवा रेल्वे आरक्षण काउंटरवरूनच घ्यावीत. तसेच आगाऊ आरक्षण करून प्रवासादरम्यान होणारी गर्दी टाळावी. या निर्णयाचे पुणे आणि मराठवाडा परिसरातील प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून, ही सेवा सणाच्या काळात नेहमी सुरू ठेवावी, अशी मागणीही प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा : 8th Pay Commission Approved: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगारा संदर्भातील मोठी बातमी; 8वा वेतन आयोगाचा ‘तो’ निर्णय कधी जाहीर होणार?