कल्याणमध्ये डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता कल्याण पूर्वेतील नामांकित भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. रुग्णावर उपचार सुरू असताना डॉक्टर रुग्णाला समजावून सांगत होते. यावेळी रुग्णाच्या मुलाचा संताप अनावर झाला आणि त्याने डॉक्टरांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील नामांकित भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर योगेंद्र जयस्वाल हे रुग्णाला त्याच्या आजाराबाबत समजावून सांगत असताना रुग्णाच्या मुलगा विनीत देशमुख संतापला आणि डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून त्याने डॉक्टरल बेदम मारहाण केली. त्यानंतर रुग्णाने स्वत आपल्या मुलाला केबिनच्या बाहेर जाण्यास सांगितले.
मात्र, काही वेळाने तो पुन्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला आणि डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे रुग्णालयातील वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला.या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांना सेवा द्यायची कशी आणि रुग्णालये सुरक्षितपणे चालवायची कशी, असा प्रश्न डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.