दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी गावात उभारण्यात आलेल्या अनधिकृत मदरसामध्ये दोन तलवारी आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्यावर आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर अनधिकृत मदरसामध्ये शेख बिलाल आलम आणि अस्लम ईस्माईल खेडेकर हे मिळून सात ते दहा वयोगटातील लहान मुलांना उर्दू व अरबी शिक्षण देत होते. या शिक्षण संस्थेसाठी कोणतीही कायदेशीर परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या गोष्टीची माहिती स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या तपासात या अनधिकृत मदरसामध्ये दोन तलवारी सापडल्या. यावरून पोलिसांनी शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा:वाळूज मध्ये उसन्या पैश्यातून निर्माण झाला वाद ;किराणा दुकानदार व दोन मुलांचे अपहरण करून बलात्काराची धमकी
घटनेनंतर तहसील प्रशासन, ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत सदर अनधिकृत इमारतीचे वीज व पाणी कनेक्शन तत्काळ बंद केले असून इमारत सध्या सील करण्यात आली आहे. प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सावंतवाडी प्रताधिकारी यांच्या सूचनेनुसार ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात विशेष बाब म्हणजे या ठिकाणी कार्यरत असलेला इसम बिहारी मुस्लिम धर्मगुरू असल्याचे सांगितले जात होते. मात्र स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार तो इसम खरेतर बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मागील चार वर्षांपासून हा मदरसा सुरू होता आणि स्थानिक नागरिकांना या ठिकाणी अनेक अडचणी येत होत्या. याठिकाणी जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. रस्ता पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात स्थानिकांनी या ठिकाणी अनधिकृत मदरसा असल्याचे पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी तपास केल्यानंतर तलवारी आढळून आल्या आणि तातडीने त्या जप्त करण्यात आल्या. यानंतर दोघांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.या पार्श्वभूमीवर स्थानिक हिंदू संघटनांनी मागणी केली आहे की, सदर अनधिकृत मदरसाची इमारत जमीनदोस्त करावी. तसेच, दोडामार्ग परिसरात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे दोडामार्ग तालुक्यात सामाजिकदृष्ट्या संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून पुढील चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन तहसील प्रशासनाने दिले आहे.तपास चालू असून हा प्रकार केवळ अनधिकृत शिक्षण संस्थेचा नसून सुरक्षा धोक्याशी निगडित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक दोघांनीही सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.