दिनांक 9 मार्च रोजी कल्याण डोंबिवली महानगर पालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी अचानक मुख्यालयातील अतिक्रमण पथकासह डोंबिवलीच्या फ व ग स्टेशन परिसरात भेट दिली. या भेटीदरम्यान व प्रभागांमधील चिमणी गल्लीमध्ये बसलेल्या भाजी विक्रेत्यांमध्ये एकच धावपळ उडाली. त्यानंतर उपायुक्त बोरकर हे त्यांच्या पथकासह डोंबिवली स्टेशन परिसरात गेले असता, स्टेशन परिसरात पदविक्रेत्यांवर कारवाई करत अवैधरित्या उभ्या असलेल्या स्टॉलवर जप्तीची कारवाई सुरू केली.
त्यानंतर उपायुक्त बोरकर हे ग प्रभागात गेल्यानंतर या परिसरात त्यांनी भेटी दिल्या व दुकानाच्या बाहेर वाढीव क्षेत्रात ज्या विक्रेत्यांनी सामान बाहेर थाटले होते असे सामान जप्त केले. उपायुक्त बोरकर यांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर व भारत पवार यांना फेरीवालांवर दैनंदिन कारवाईच्या सूचना दिल्या असून, 150 मीटर स्टेशन परिसरात कोणत्याही फेरीवाल्यास बसू देण्यात येऊ नये अशा सूचना दिल्यात. नागरिकांना पदपथ हे चालण्यासाठी मुक्त करावे असे देखील आदेश त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले.