डोंबिवली: मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा ही शहराची 'लाईफलाईन' असली तरी, गेल्या काही काळापासून ती डोंबिवलीकरांसाठी 'डेथलाईन' ठरू लागली आहे. दोन आठवड्यांपूर्वी बारावीच्या परीक्षेला निघालेल्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्याचा मुंब्रा-कळवा दरम्यान लोकलमधून पडून झालेला दुर्दैवी मृत्यू ही केवळ एक घटना नव्हती, तर ती प्रशासकीय उदासीनतेवर झालेली मोठी चपराक होती. या भीषण दुर्घटनेनंतर खडबडून जागी झालेल्या कल्याण-डोंबिवली (KDMC) आणि ठाणे (TMC) महानगरपालिका प्रशासनाने अखेर समन्वयाचा हात पुढे केला आहे. रेल्वेवरील जीवघेणा ताण कमी करण्यासाठी 4 मार्चपासून डोंबिवली ते ठाणे अशी थेट बससेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वेच्या डब्यात पाय ठेवायलाही जागा नसलेल्या सकाळी आणि संध्याकाळच्या 'पीक अवर'मध्ये प्रवाशांना एक सुरक्षित पर्याय देण्याचा हा प्रयत्न आहे. या नवीन उपक्रमांतर्गत सुरुवातीला 40 आसनक्षमता असलेल्या दोन बस या मार्गावर धावणार आहेत.
प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, सकाळी चार आणि संध्याकाळी चार अशा एकूण आठ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ही बस सेवा डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव सर्कल येथून सुटणार असून, नव्याने बांधलेल्या मोठागाव-मानकोली पुलावरून मानकोली आणि थेट ठाण्याच्या माजिवाडा चौकापर्यंत प्रवास करेल. ठाण्यातील घोडबंदर रोड किंवा माजिवाडा परिसरात कामासाठी जाणाऱ्या नोकरदार वर्गासाठी हा मार्ग जणू 'ग्रीन कॉरिडॉर' ठरणार आहे.
हेही वाचा: Ladki Bahin Yojana : ई-केवायसी भरूनही खात्यात पैसे जमा नाहीत, बहिणींचा संताप
मात्र, प्रशासनाचा हा निर्णय 'देर आये दुरुस्त आये' असा असला तरी, त्यातील व्यवहार्यतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तांत्रिकदृष्ट्या मोठागाव-मानकोली पूल हा प्रवासाचे अंतर कमी करणारा असला तरी, भौगोलिकदृष्ट्या ही बससेवा डोंबिवलीच्या मोठ्या लोकसंख्येला सामावून घेण्यास अपयशी ठरू शकते.
डोंबिवली रेल्वे स्थानकापासून किंवा पश्चिमेतील मुख्य भागातून मोठागाव सर्कलला पोहोचण्यासाठीच प्रवाशांना रिक्षाने वीस मिनिटे मोजावी लागतात. अशा परिस्थितीत, जो प्रवासी रेल्वे स्थानकाच्या जवळ राहतो, तो बस पकडण्यासाठी पुन्हा वीस मिनिटे उलट्या दिशेला प्रवास करण्याची जोखीम पत्करणार का, हा मोठा पेच आहे.
डोंबिवली पूर्व, मानपाडा रोड आणि कल्याण रोड या भागातील प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. या प्रवाशांना आजही लोकलशिवाय दुसरा प्रभावी पर्याय उपलब्ध नाही. "दुधाची तहान ताकावर" भागवण्यासारखा हा प्रयत्न असल्याची टीका आता प्रवासी संघटनांकडून होत आहे. जर प्रशासनाला रेल्वेवरील गर्दी खरोखरच कमी करायची असेल, तर ही बससेवा केवळ पश्चिमेतील एका कोपऱ्यापुरती मर्यादित न ठेवता, ती डोंबिवली पूर्व आणि मुख्य स्थानक परिसराशी जोडणे अनिवार्य आहे. केवळ दोन बस आणि आठ फेऱ्यांच्या जोरावर लाखो प्रवाशांचा भार पेलणे हे निव्वळ अशक्यप्राय गणित आहे.
एकूणच, 4 मार्चपासून सुरू होणारी ही सेवा म्हणजे एका मोठ्या संकटावर केलेली 'प्राथमिक मलमपट्टी' आहे असे म्हणता येईल. रस्ते मार्गाचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे, पण त्यासाठी बसची संख्या वाढवणे आणि प्रवाशांच्या सोयीची पिक-अप पॉईंट्स निश्चित करणे गरजेचे आहे. अन्यथा, रेल्वेच्या गर्दीत चिरडणारा सामान्य माणूस "पुढच्या स्टेशनला उतरतो" म्हणत पुन्हा त्याच लोखंडी चाकांकडे वळेल. प्रशासनाने टाकलेले हे पाऊल स्वागतार्ह असले तरी, ते 'दिलासा' देणारे ठरते की केवळ 'प्रायोगिक तत्त्वावर' राहते, हे येणारा काळच ठरवेल.
हेही वाचा: Thane-Belapur Elevated Road: ठाणे ते नवी मुंबई विमानतळ प्रवास आता सुस्साट; 'डबल डेकर' उन्नत मार्गामुळे वाचणार वेळ