Matoshree Drone News: राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ड्रोन उडवण्यात आल्याचा आरोप शिलेदार अंबादास दानवे यांनी केला आहे. मातोश्री परिसरात ड्रोन घिरट्या घालत असल्याचे एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आणि यावरुन सरकार आणि पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दानवे म्हणाले की, मातोश्री ही हाय सेक्युरिटी झोन असून या परिसरात ड्रोन दिसणे आणि याची योग्य ती पाहणी न होणे सरकार आणि गृह विभागासाठी गंभीर प्रश्न निर्माण करते. त्यांच्या मते, या ड्रोनच्या माध्यमातून कोणत्याही हेतूने मातोश्रीवर नजर ठेवली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
ड्रोन धोरणात मुंबई रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. मग सध्या 'मातोश्री' निवस्थानाबाहेर मात्र असे ड्रोन सर्रास दिसायला लागले आहेत. हाय सेक्युरिटी झोन असलेल्या 'मातोश्री'च्या परिसरात असे ड्रोन दिसणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. मातोश्रीवर कोणी टेहळणी तर करत नाहीये?… pic.twitter.com/l3YV9OOSyT — Ambadas Danve (@iambadasdanve) November 9, 2025
व्हिडिओमध्ये दिसते की मातोश्री परिसराभोवती ड्रोन घिरट्या मारत आहे आणि त्याची हालचाल खूप जवळून नोंदवली गेली आहे. या व्हिडिओच्या पोस्ट नंतर मुंबईत राजकीय चर्चेला उधाण आले आहे. दानवे यांनी सरकारवर आणि पोलिसांवर आरोप केला की, हाय सेक्युरिटी झोनमध्ये अशा प्रकारच्या ड्रोन हालचालींवर योग्य लक्ष दिले जात नाही.
राजकीय विरोधक सुनील राऊत यांनी या प्रकरणी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी पोलिसांवर विश्वास नाही, कारण पोलिस सरकारच्या आदेशानुसार काम करत असल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, उद्धव ठाकरेंपासून सरकारला भीती असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना अजून गंभीर स्वरूपात चर्चेचा विषय बनली आहे. नागरिक आणि राजकीय विश्लेषक यांच्यामध्ये यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काहींचा असा आरोप आहे की, अशा प्रकारच्या हालचालींमुळे हाय सेक्युरिटी झोनमध्ये सुरक्षेची खात्री धोक्यात येऊ शकते.
पण यावर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, MMRDला त्या भागाची पाहणी करायची असल्याने तिथे ड्रोन उडवण्यात आले, या मागे कुठलाही वाईट हेतू नव्हता. पोलिसांनी ही बाब योग्य प्रकारे नियंत्रित असल्याचे सांगून नागरिकांमध्ये शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.