Sushma Andhare Video : सुषमा अंधारे यांचा एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; पत्रकार परिषदेत थेट पुरावे, बॅनर सादर

सुषमा अंधारे यांनी या रॅकेटमध्ये थेट सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि नातेवाईकांचा थेट संबंध असल्याचा दावा केला आहे. तसेच, त्यांनी या प्रकरणाचे बांगलादेश कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Sushma Andhare Video : सुषमा अंधारे यांचा एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; पत्रकार परिषदेत थेट पुरावे, बॅनर सादर

Sushma Andhare Press Conference on Satara Drugs Case : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी सातारा जिल्ह्यातील अमली पदार्थ कारवाईवरून राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. साताऱ्यापासून 40 किमी अंतरावर असलेल्या सावरी गावात झालेल्या कारवाईत 45 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, त्याची बाजारपेठेतील किंमत तब्बल 115 कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आपल्या सुरक्षेची हमी मागितली आहे. सतीश उके किंवा नवाब मलिक यांच्याप्रमाणेच आपल्यासोबतही सूडबुद्धीने काही गोष्ट होऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

सत्ताधारी नेत्यांशी संबंधित व्यक्तींवर आरोप
सुषमा अंधारे यांनी या रॅकेटमध्ये थेट सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि नातेवाईकांचा थेट संबंध असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, ज्या शेडमध्ये अमली पदार्थ सापडले, ती जागा गोविंद शिनकर यांच्या मालकीची आहे, तर शेजारील रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे. अंधारे यांच्या दाव्यानुसार, प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. याव्यतिरिक्त, या प्रकरणात फरार झालेला रणजीत शिंदे हा शिवसेनेचा तालुकाप्रमुख असून मुख्यमंत्र्यांच्या गावाचा सरपंच असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, या रॅकेटमध्ये अजित पवार यांच्या गटाचा पदाधिकारी विशाल मोरे यालाही ताब्यात घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला.

पोलीस तपासावर आणि एफआयआरवर प्रश्नचिन्ह
साताऱ्यातील स्थानिक पोलिसांनी कारवाई न करता मुंबई पोलिसांनी तिथे जाऊन कारवाई का केली, असा सवाल अंधारे यांनी केला आहे. “न्यायालयाच्या आदेशानुसार ‘एफआयआर’ (FIR) हा सार्वजनिक दस्तऐवज असतो, मग या प्रकरणाची माहिती ऑनलाईन का उपलब्ध नाही?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी माहिती लपवल्याचा आरोप करत, पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात काही मुख्य आरोपींची नावे का वगळण्यात आली, याचे उत्तर त्यांनी मागितले आहे. ओमकार डिगे नावाच्या व्यक्तीकडे या शेडची चावी होती, त्याला अटक करून नंतर का सोडून दिले, यावरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Manikrao Kokate: कोकाटेंची राजकीय कोंडी वाढली! कोर्टाने केले अटक वॉरंट जारी

बांगलादेशी कनेक्शनचा संशय
सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात आसाम आणि बांगलादेशी कनेक्शन असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. कायम सय्यद, हाबीजुल इस्लाम आणि खलील रेहमान हे तीन लोक या शेडमध्ये राहत होते, त्यांना आसाममधून कुणी आणले? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. या लोकांना जेवण हे प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलवरून पुरवले जात होते, असा दावाही त्यांनी केला. या रॅकेटमध्ये बांगलादेशी नागरिकांचाही समावेश असल्याचे समोर येत असताना सत्ताधारी पक्ष गप्प का आहे आणि या तीन लोकांची नावे पोलीस का लपवत आहेत, अशी विचारणा त्यांनी केली.

राज्याच्या भविष्यासाठी सुरक्षेची मागणी
ही पत्रकार परिषद केवळ राजकीय हेतूने नसून राज्याच्या भविष्याशी आणि तरुणांच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले. 13 तारखेला सावरी गावाव्यतिरिक्त वर्धा, मुलुंड आणि पुण्यातही अशाच अमली पदार्थ विरोधी कारवाया झाल्याचे त्यांनी सांगितले. “राजकारण बाजूला ठेवून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचा पारदर्शक तपास करावा आणि मला एक नागरिक म्हणून संरक्षण द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली आहे. अमली पदार्थांच्या या मोठ्या रॅकेटमधील ‘खरे सूत्रधार’ समोर येणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठवली.

हेही वाचा – Pradnya Satav: हिंगोलीच्या राजकारणात खळबळ! काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number