Sanjay Raut And Eknath Shinde Meeting: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा राजकीय आखाडा तापलेला असतानाच, गुरुवारी मुंबईत एक अत्यंत दुर्मिळ आणि सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत यांची एका कार्यक्रमादरम्यान समोरासमोर भेट झाली. मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये आयोजित वृत्तवाहिनीच्या मुलाखतीसाठी हे दोन्ही नेते आले होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे आपली मुलाखत संपवून बाहेर पडत असतानाच, राऊत आपल्या मुलाखतीसाठी स्टुडिओकडे जात होते. एरवी राजकीय भाषणांतून एकमेकांवर तिखट शब्दांत तुटून पडणारे हे दोन्ही नेते जेव्हा प्रत्यक्ष समोरासमोर आले, तेव्हा त्यांनी सर्व मतभेद बाजूला सारून एकमेकांना अभिवादन केले आणि हस्तांदोलन करत सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवले.
या औपचारिक भेटीत राजकीय चर्चेऐवजी उभय नेत्यांनी एकमेकांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. संजय राऊत हे नुकतेच एका दीर्घ आजारपणातून सावरले असल्याने, शिंदेंनी त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली. विशेष म्हणजे, राऊत आजारी असतानाही शिंदेंनी त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीचा आढावा घेतला होता.
हेही वाचा – Rahul Narvekar: तेजल पवार यांना चार-पाच दिवसांनंतर जाग आली का? राहुल नार्वेकर यांचा संतप्त सवाल
आजच्या या भेटीत राऊतांनीही शिंदेंच्या प्रकृतीबाबत विचारले आणि साधारण 2 मिनिटे त्यांच्यात जुजबी गप्पा झाल्या. शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही गटांत निर्माण झालेले प्रचंड वितुष्ट आणि सुरू असलेली विखारी टीका या पार्श्वभूमीवर, या भेटीचा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीतही महाराष्ट्राच्या राजकारणातील ही भेट सध्या सर्वत्र चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.