Thursday, July 17, 2025 02:38:50 AM

कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी

कार्ला येथील एकविरा देवी मंदिरात 7 जुलैपासून अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी लागू होणार आहे. ड्रेस कोडसंदर्भात नवे नियम जाहीर करण्यात आले असून पारंपरिक पोशाख अनिवार्य केला आहे.

कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी

कार्ला: आगरी कोळी बांधवांसह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे,एकविरा आईचे व मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हि बंदी घालण्यात आली असून ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी 7 जुलै पासून करण्यात येणार असल्याची माहिती कार्ला एकविरा आई ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.शुक्रवारी कार्ला येथे आई एकविरा देवीच्या मंदिरात विश्वस्थ मंडळाच्या बैठकीत एकमताने ड्रेस कोड संदर्भात हा ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.

कार्ला येथील एकविरा आई हि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून राज्यासह देशातील अनेक ठिकाणाहून भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात.मात्र काही भक्त अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात,त्यामुळे देवीचे व मंदिराचे पावित्र्य धोक्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी विश्वस्थ मंडळाकडे आल्या असून अनेक भक्तांनी सोशल मिडयाद्वारे ड्रेस कोड संदर्भात मागणी केली केली होती.भक्तांच्या मागणीनुसार विश्वस्थ मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.

कोणत्या कपड्यांना बंदी? 

-शॉर्ट,मिनी स्कर्ट, वेस्टर्न कपडे,फाटक्या जीन्स,हाफ पँट व अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांना बंदी घालण्यात आली आहे.

कोणते कपडे घालावेत?

महिला व मुलींनी- साडी, सलवार कुर्ता,किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे घालावेत ज्याने पूर्ण अंग झाकलेले असावे.

पुरुषांनी व मुलांनी- धोतर,कुर्ता पायजमा,पँट शर्ट,टी शर्ट व इतर पारंपरिक कपडे ज्याने पूर्ण अंग झाकलेले असावे.

भक्तांशी वाद घालणाऱ्या मंदिरातील कर्मचाऱ्यांना देखील दिल्या सूचना- 
एकविरा देवीच्या मंदिरात दर्शन घेतांना येथील कर्मचारी भक्तांवर आरडा ओरड करत असून भक्तांशी वाद घालत असल्याच्या तक्रारी देखील विश्वस्थ मंडळाकडे आल्या असल्याने मंदिरातील कर्मचाऱ्यांनी देवी भक्तांशी वाद न घालण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली असून एकविरा आईच्या भक्तांनी देखील देवीचे दर्शन घेतांना मंदिरातील सूचनांचे पालन करावे असे आवाहन देखील ट्रस्टचे प्रमुख विश्वस्थ खासदार बाळ्या मामा यांनी देवी भक्तांना केले आहे.


सम्बन्धित सामग्री