भारतीय हवामान विभागाने यंदा एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केली असून त्यामुळे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील धरणे, जलाशय आणि इतर जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.
जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डौले यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सध्या सुरू असलेली सिंचनासाठीची पाण्याची आवर्तने तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून त्याचे संवर्धन करण्यावर भर देण्यात आला आहे.या संदर्भात शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सर्व जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील धरणे आणि जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक परिस्थिती वगळता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेला साठा इतर कोणत्याही उद्देशासाठी वापरू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, 31 ऑगस्टपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात अखंडित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी धरणांमध्ये राखीव ठेवलेला पाणीसाठा काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने वापरण्यात यावा. यासाठी जिल्हास्तरावर आवश्यक उपाययोजना आणि कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही प्रधान सचिवांनी दिल्या आहेत.
पाणीसाठ्याचे व्यवस्थापन आणि पिण्याच्या पाण्याचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने विविध स्तरांवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार उपलब्ध जलसाठा, सिंचन आवर्तने बंद करण्यासंदर्भातील कार्यवाही आणि बेकायदेशीर पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईचा तपशीलवार अहवाल आठवड्याच्या आधारावर सादर करावा लागणार आहे.