विश्वास ही अशी गोष्ट आहे, जी काहीजण पटकन ठेवतात, तर काहीजण कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी अनेकदा विचार करतात. मात्र, चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास कधी-कधी हा आयुष्यभर न विसरता येणारा अनुभव देतो. अशाच एका महिलेचा विश्वास तिच्यासाठी महागात पडला असून, तिच्यासोबत जे घडलं आहे, त्याची कल्पनाही तिने केली नसेल.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, घडलेली संपूर्ण घटना ही शिरुर तालुक्यातील आहे. जिथं महिलेचा विश्वास संपादन करून सोन्याच्या बिस्कीटाचे आमिष दाखवत तीन तोळे सोन्याचे दागिने लुबाडणाऱ्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी बीड जिल्ह्यातून अटक केली. अभिमान बाबू तुपे (वय 49)असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
करंदी येथील नंदा दरेकर या 28 सप्टेंबर रोजी शिक्रापूरच्या चाकण चौकात वाहनाची वाट पाहत असताना आरोपीने त्यांच्याशी गोड बोलून विश्वास संपादन केला. त्यानंतर दोन सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यातील पानपोत घेऊन त्याबदल्यात पितळेचे बिस्कीट दिले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.
CCTVने आरोपीचा पर्दाफाश
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत शिक्रापूर पोलिसांनी बीडमधून आरोपीला अटक केली. या गुन्ह्यात आणखी एक आरोपी निष्पन्न झाला असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.