Friday, December 05, 2025 02:50:22 AM

Uddhav Thackeray: 'शेतकरी या दगाबाज सरकारचा पंचनामा करतील...'; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना अद्याप मदत पोहोचली नसल्याने नाराजी व्यक्त करत सरकारला चांगलचं धारेवर धरलं. शेतकरी या दगाबाज सरकारचा पंचनामा करेल, असं दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

uddhav thackeray शेतकरी या दगाबाज सरकारचा पंचनामा करतील उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

जालना: शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. जालन्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तीव्र टीका केली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना अद्याप मदत पोहोचली नसल्याने नाराजी व्यक्त करत सरकारला चांगलचं धारेवर धरलं. शेतकरी या दगाबाज सरकारचा पंचनामा करेल, असं दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी म्हटलं की, ' अद्याप अनेक भागात पंचनामे झाले नाहीत. एका ठिकाणी तहसीलदारने शेतकाऱ्याला सांगितलं मुख्यमंत्र्याकडे जा. पण वरूनचं निधी आला नसेल तर तो तरी काय करणार. हे सरकार दगाबाज आहे, हे पॅकेज कसं बोगस आहे, हे दाखवण्यासाठीचं मी संवाद दौरा केला,' असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी ठाकरे यांनी केली.

हेही वाचा -   Maharashtra politics : नगरपालिका निवडणुकीत 'स्वबळा'चे संकेत!; सिंधुदुर्गात राणे-केसरकर आमनेसामने, महायुतीतील तणाव पुन्हा चव्हाट्यावर

शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावरून ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ज्या शेतकऱ्याची जमीन पूर्णपणे खरडून गेली आहे, त्याच्याच जमिनीवर उभं राहून मी त्याला काय सांगू. ‘इथून महामार्ग जाणार आहे’? हा विकास आहे की विनाश? शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात आहेत. ही जनतेने मागणी न केलेली योजना असून या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचं भविष्य उद्ध्वस्त होणार आहे. 

हेही वाचा - PMC Abhay Yojana : पुणे मनपाची 'अभय योजना' जाहीर; मिळकत कर थकबाकीदारांना दंडावर मिळणार चक्क 75 टक्के सवलत

दरम्यान, उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. आता सातबारा कोरा करण्याचीच योग्य वेळ आहे. यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सरकारने सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते अजूनही फक्त आश्वासनच राहिलं आहे. तथापी, यावेळी त्यांनी केंद्रीय पथकावरही निशाणा साधला. “हे पथक कधी आलं आणि गेलं, हे शेतकऱ्यांनाही समजलं नाही. केवळ कागदावर मदत दाखवून शेतकऱ्यांना फसवणं थांबवावं,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
 


सम्बन्धित सामग्री