Buldhana Accident: जळगाव जिल्ह्यात सोमवारी दुपारी घडलेल्या एका भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाकोड गावाजवळ मारुती सुझुकी ग्रँड विटारा SUV टायर फुटल्याने नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला धडकून आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्दैवी घटनेत एका पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेचा जिवंत जळून मृत्यू झाला.
क्षणात पेटली गाडी
प्राथमिक माहितीनुसार, ग्रँड विटारा वेगाने संभाजीनगरच्या दिशेने जात असताना पिंपळगाव फाट्याजवळ गाडीचा टायर अचानक फुटला. नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जोरदार आदळली. त्यानंतर क्षणार्धात गाडीने पेट घेतला. आगीची तीव्रता इतकी होती की कार काही मिनिटांत पूर्णपणे जळून खाक झाली.
हेही वाचा - PM E Drive Scheme : पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीत बदल घडणार; केंद्र सरकारकडून 1000 ई - बसेससाठी हिरवा कंदील
स्थानिक नागरिकांनी गाडीचा आवाज आणि धूर पाहताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी काच फोडून चालकाला बाहेर काढण्यात यश मिळवले, मात्र आत असलेली महिला दाट धुरामुळे बाहेर पडू शकली नाही. चालकाने शुद्धीवर आल्यानंतर सांगितले की ती अजूनही गाडीत आहे, पण तोपर्यंत आग अनियंत्रित झाली होती. दुर्दैवाने, महिला गाडीतच जिवंत जळाली. बुलढाणा जिल्ह्यातील संग्राम मोरे हे पत्नी माहेरी गेली म्हणून तिला घ्यायला भुसावळ तालुक्यातील बोर्डी गावाला गेले होते. या दाम्पत्याच एक वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मृत पत्नी जान्हवी ही पाच महिन्यांची गर्भवती होती.
हेही वाचा - Pune Land Scam : पार्थ पवार जमीन प्रकरणावर अंजली दमानिया आक्रमक; शीतल तेजवानींची भूमिका संशयास्पद?
आग विझवण्यासाठी तातडीचे प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस, महामार्ग पोलीस, आरटीओ पथक तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विशाल जोशी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाकोडहून पाण्याचा टँकर आणि जामनेर अग्निशमन दल बोलावण्यात आले. मात्र त्यांच्या प्रयत्नांनंतरही कार पूर्णपणे जळून गेली होती. जखमी संग्राम मोरे यांच्यावर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून ते धोक्याबाहेर असल्याचे कळते. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.