Nanded MLC Election Result: नांदेड विधान परिषदेच्या रणसंग्रामात सत्ताधारी महायुतीने एकतर्फी बाजी मारली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार अमर राजुरकर यांनी विरोधकांना धूळ चारत प्रचंड मतांनी विजय संपादन केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि नुकतेच शिंदे गटात गेलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा आष्टीकर यांना केवळ 84 मतांवर समाधान मानावे लागले. या लाजिरवाण्या पराभवानंतर ठाकरे गटाने कृष्णा आष्टीकर यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी या कारवाईची अधिकृत घोषणा केली असून, वडिलांच्या राजकीय भूमिकेचा थेट फटका मुलाला बसल्याचे या निकालाने स्पष्ट केले आहे.
राजकीय खेळी आणि नाट्यमय घडामोडी
या जागेसाठी सुरुवातीला काँग्रेसच्या रामदास पाटील सोमठाणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, ठाकरे गटातून निवडणूक लढवण्यास उत्सुक असलेल्या कृष्णा आष्टीकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. महाविकास आघाडीतील अंतर्गत वादानंतर अखेरच्या क्षणी काँग्रेसने आपली उमेदवारी मागे घेतली आणि कृष्णा आष्टीकर हे मविआचे अधिकृत चेहरे बनले. संपूर्ण निवडणुकीत एकूण 451 मतदारांपैकी भाजपच्या अमर राजुरकर यांना 339 मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळाला, तर 23 मते बाद ठरली.
कृष्णा नागेश पाटील (आष्टीकर )
यांची पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे! — Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2026
‘ऑपरेशन टायगर’ आणि मतांचे ध्रुवीकरण
निवडणूक ऐन रंगात आलेली असतानाच राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या. यामध्ये कृष्णा यांचे वडील नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव समोर आल्याने महाविकास आघाडीच्या गोटात तीव्र अस्वस्थता पसरली. कृष्णा आष्टीकर आपण ठाकरे गटाशी प्रामाणिक असल्याचा दावा करत राहिले, तरी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले. याचा थेट फायदा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेल्या अमर राजुरकर यांना झाला आणि मविआची हक्काची मते भाजपच्या पारड्यात पडली.
पराभवानंतर बदलला सूर; वडिलांच्या स्वागताची तयारी
पक्षामधून हकालपट्टी झाल्यानंतर कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या भूमिकेत कमालीचा बदल पाहायला मिळाला. सुरुवातीला वडिलांच्या बंडखोरीशी आपला संबंध नसल्याचे सांगणारे कृष्णा आता उघडपणे वडिलांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. “पराभवानंतर मी माझ्या वडिलांच्या विरोधात जाणार नाही,” अशी स्पष्ट घोषणा त्यांनी केली. तसेच, हिंगोलीत येणाऱ्या आपल्या वडिलांचे नांदेड विमानतळावर जंगी स्वागत करणार असल्याचे सांगत, ज्यांनी आपल्यावर टीका केली त्यांना कृतीतून उत्तर देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.