Tukaram Mundhe: भेसळीनंतर आता FDA ची नजर शाळेच्या कँटिनवर, विद्यार्थ्यांच्या आहाराची होणार तपासणी

विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे, या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत असून या संदर्भात मुंबईत नुकतीच संबंधित अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठकही पार पडली.

Tukaram Mundhe: भेसळीनंतर आता FDA ची  नजर शाळेच्या कँटिनवर, विद्यार्थ्यांच्या आहाराची होणार तपासणी

राज्यात अन्नभेसळीविरोधात सुरू असलेल्या व्यापक कारवाईनंतर आता अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी शाळांतील उपहारगृह आणि कँटीनमध्ये विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे, या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत असून या संदर्भात मुंबईत नुकतीच संबंधित अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठकही पार पडली.

अन्न व औषध प्रशासनाने शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच मध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या आणि पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठका आयोजित केल्या. या बैठकीत विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जा, स्वच्छता, अन्नसुरक्षा मानके आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शालेय पोषण आहारात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व संबंधितांनी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळांच्या 500 मीटर परिसरात 'स्टिंग' या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार विक्रम पाचपुते यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केल्यानंतर सरकारने ही भूमिका घेतली. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाने शालेय परिसरातील अन्न व पेयपदार्थांच्या तपासणी मोहिमेला अधिक गती दिली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.

जे. जे. महानगर रक्तपेढी प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने राज्यातील रक्तपेढ्यांवरही मोठी कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन आणि गंभीर त्रुटी आढळल्याने एकूण १९ रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. रक्तसंकलन, साठवणूक, वितरण आणि शासकीय निकषांचे पालन यामध्ये अनियमितता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपासणीसाठी स्वतंत्र सहायक आयुक्तांची नियुक्तीही करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number