बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे वाऱ्यांची दिशा बदलली असून, यामुळे थंडीत तात्पुरती घट झाली होती. राज्यातील वातावरणात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होणार असून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवेल. यावेळी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस असणार आहे.
तसेच पश्चिम महाराष्ट्रात गारठा जाणवणार असून पुण्यात किमान तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस राहणार आहे. कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्यावर थंडीचा कडाका कमी होईल. तर दुसरीकडे मराठवाड्यात किमान तापमान 12 ते 15 अंशांपर्यंत असणार आहे. विदर्भात थंडीचा गारठा तीव्र राहणार आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 29 ते 31 अंश, तर किमान तापमान 11 ते 14 अंश सेल्सिअस असू शकतो.
केरळ आणि कर्नाटकाच्या समुद्र किनाऱ्यावरून एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे कोकणातील हवामानात मोठे बदल होऊ शकतात. केरळ आणि कर्नाटकाच्या समुद्र किनाऱ्यावर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं असून यामुळे कोकणात सोसाट्याचा वारा आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. ज्यामुळे कोकणातील मासेमाऱ्यांना खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे.