Pune Crime: वादग्रस्त कारकीर्दीमुळे भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) बडतर्फ झालेल्या पूजा खेडकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मात्र, यावेळी कारण वेगळे असून त्यांच्या पुण्यातील बाणेर येथील निवासस्थानी रविवारी मध्यरात्री धाडसी चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. घरातीलच एका नोकराने पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध करून, तर पूजा खेडकर यांचे हात पाय बांधून लूटमार केली.
नेपाळी नोकराचे कृत्य
प्राप्त माहितीनुसार, बाणेर रस्त्यावरील खेडकर कुटुंबाच्या बंगल्यात गेल्या आठ दिवसांपूर्वीच नेपाळवरून आलेला एक तरुण नोकर म्हणून कामाला लागला होता. रविवारी मध्यरात्री या नोकराने आपला खरा चेहरा दाखवला. त्याने दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. तसेच पूजा खेडकर यांना दोरीने बांधून ठेवले जेणेकरून त्या प्रतिकार करू शकणार नाहीत. यानंतर घरातील सर्वांचे मोबाईल फोन आणि इतर साहित्य घेऊन तो नोकर पसार झाला.
स्वतःची सुटका आणि पोलिसांना पाचारण
दोरीने बांधलेल्या अवस्थेत असलेल्या पूजा खेडकर यांनी हार न मानता दरवाजाच्या कडीचा आधार घेत स्वतःचे हात सोडवले. त्यानंतर दुसऱ्या एका फोनवरून त्यांनी तात्काळ चतुःश्रृंगी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बेशुद्ध असलेल्या दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – Crime News: ऑम्लेटचा एक तुकडा, AIची मदत आणि पोलिसांची हुशारी; कसा झाला ब्लाइंड मर्डरचा खुलासा?
तक्रार देण्यास टाळाटाळ?
घटनेचे गांभीर्य असूनही पूजा खेडकर यांनी अद्याप पोलिसांत लेखी तक्रार नोंदवलेली नाही. "सध्या मनस्थिती ठीक नसल्याने नंतर तक्रार देऊ," अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मोबाईल व्यतिरिक्त घरातून नक्की काय चोरीला गेले, याचीही अधिकृत माहिती त्यांनी दिलेली नाही. आधीच विविध प्रकरणांमुळे वादात असलेल्या खेडकर कुटुंबाने या गंभीर गुन्ह्याबाबत तक्रार नोंदवण्यास विलंब केल्यामुळे पोलीस वर्तुळात आणि नागरिकांमध्ये तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.