‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’चा गजर फक्त महाराष्ट्रातच नाही, तर आता सातासमुद्रापार आफ्रिका खंडातील नायजेरियातील लागोस शहरातही घुमत आहे. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आणि मूलतः लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आता परदेशातही त्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने जपली जात आहे.
आपली ही परंपरा जपण्याचे श्रेय जाते ते सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील आनेवाडी गावचे सुपुत्र मुकेश महामुलकरला.कामानिमित्त 16 वर्षांपूर्वी नायजेरियातील लागोस शहरात गेलेल्या मुकेश महामुलकर याने परदेशात असूनही आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. परदेशात आपल्या माणसांनी एकत्र यावे, आपले सण-उत्सव साजरे करावेत या उद्देशाने त्यांनी लागोसमध्ये गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला काही मोजक्या भारतीय बांधवांच्या सहभागातून अगदी छोट्या स्वरूपात सुरू झालेला हा गणेशोत्सव, हा आज तिथे एका मोठा उत्सव मानला जात आहे.
हेही वाचा – Lalbhaughch Raja 2026: डॉलरच्या हारानंतर आता लालबागच्या राजाला सोन्याचा हार
लागोस येथील प्रसिद्ध स्टर्लिंग ऑईल कंपनीच्या आवारात त्यांनी गणेश मंडळाची अधिकृत स्थापना केली आहे. गेल्या 16 वर्षांपासून अखंडपणे या मंडळाच्या माध्यमातून दहा दिवस गणरायाची विधिवत पूजा-अर्चा केली जाते. दररोज सकाळ-संध्याकाळ आरती, भजन, तसेच विविध प्रकारचे देखावे आणि धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या काळात संपूर्ण परिसरात एक वेगळेच भक्तिमय वातावरण निर्माण होते.या गणेशोत्सवाचे सर्वात मोठे आणि खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ भारतीय नागरिकच नव्हे, तर नायजेरियातील स्थानिक नागरिकही मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. सुरुवातीला कुतूहल म्हणून येणारे स्थानिक नागरिक आता भक्तिभावाने या उत्सवात सामील होतात. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरासोबतच ‘राम नाम’च्या जयघोषानेही संपूर्ण परिसर दुमदुमून जातो.
या उत्सवाच्या निमित्ताने भारतीय संस्कृती, बाप्पावरची श्रद्धा, एकजूट आणि परंपरेची ओळख नायजेरियन नागरिकांना होत आहे, जे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना मुकेश महामुलकर म्हणाले, “आमच्या गणेश मंडळाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी 10 दिवस विविध देखावे, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. परदेशात असलो तरी हे 10 दिवस आम्ही मोठ्या भक्तीने आणि जल्लोषात साजरे करतो. इथले स्थानिक लोकही उत्साहाने आमच्यात सामील होतात. आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.”
परदेशात राहूनही आपली संस्कृती विसरली नाही, उलट ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे कार्य मुकेश महामुलकर करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे आनेवाडी गावासह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी मराठी माणूस आपली संस्कृती जपतोच, याचे हे उत्तम उदाहरण आहे.