Eknath Shinde Inquires About Raut’s Health: राज्यात नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांची मालिका सातत्याने सुरू असताना, आज एक वेगळी आणि सकारात्मक झलक पाहायला मिळाली आहे. आज महाराष्ट्राने विरोध विसरून राजकीय सुसंस्कृतीचे दर्शन अनुभवले आहे. शिवसेना (ठाकरे गट) चे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या तब्यतीत अचानक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय कारणास्तव डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून पुढील दोन महिने ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणार आहेत. राऊत आता नवीन वर्षातच पुन्हा राजकीय कार्यात सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख नेत्यांनी पक्षीय सीमा विसरून मानवी भावना जपल्याचे चित्र दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संजय राऊत यांच्या तब्यतीबाबत चौकशी केली आहे.
विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यात गेल्या काही वर्षांपासून तीव्र राजकीय मतभेद दिसून आले आहेत. तरीदेखील शिंदेंनी वैयक्तिक काळजी व्यक्त करत संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राऊत लवकर बरे व्हावेत, अशी शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून संजय राऊत यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करत “त्यांना लवकरात लवकर स्वास्थ्य लाभो” अशी प्रार्थना केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील फोनवरून त्यांच्या तब्यतीची विचारपूस केली होती. राजकीय वैर विसरून नेत्यांनी दाखवलेली ही आपुलकी पाहून महाराष्ट्राच्या राजकारणात आज खऱ्या अर्थाने माणूसकी जपल्याची भावना दिसून आली.