मुंबई: जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदीची योजना आखत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी दिलासादायक ठरू शकतो. सर्राफा बाजारात अचानक मोठी घसरण नोंदवण्यात आली असून, एका झटक्यात चांदीचे दर तब्बल 20000 रुपयांनी कोसळले आहेत, तर सोनेही सुमारे 6000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून उच्चांक गाठणाऱ्या मौल्यवान धातूंमध्ये आलेल्या या घसरणीमुळे बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
भारतीय वायदा बाजारात (MCX, Multi Commodity Exchange) शुक्रवार, 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी साडे नऊ वाजता चांदीच्या किमतींमध्ये 4.18 टक्क्यांची तीव्र घसरण पाहायला मिळाली. मागील सत्राच्या तुलनेत चांदीचा दर घसरून 380181 रुपये प्रति किलोपर्यंत आला. विशेष म्हणजे, अवघ्या एक दिवस आधीच चांदीने 400000 रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार केला होता.
याचप्रमाणे, सोन्याच्या दरातही (Gold Price) मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 3.04 टक्क्यांनी घसरून 177710 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर व्यवहार करत आहे. गुरुवारी सोन्याचा भाव जवळपास 183000 रुपयांपर्यंत पोहोचला होता, त्यामुळे आजची घसरण लक्षवेधी मानली जात आहे.
हेही वाचा: Maharashtra Budget 2026 : यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार?
बजेट 2026 सादर होण्याच्या अगदी आधी आलेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली असली, तरी खरेदीदारांच्या चेहऱ्यावर मात्र समाधान दिसत आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढलेल्या किमतींमुळे सामान्य ग्राहक खरेदीपासून दूर राहिला होता, मात्र आजच्या घसरणीने पुन्हा बाजारात हालचाल वाढण्याची शक्यता आहे.
या घसरणीमागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. मागील एका आठवड्यात चांदीच्या दरात सुमारे एक लाख रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे उच्च दरांवर गुंतवणूकदारांनी नफा वसुली (Profit Booking) सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात विक्री झाली. तसेच अमेरिकन डॉलरमधील मजबुती, फेडरल रिझर्व्हच्या (Federal Reserve) धोरणात्मक संकेतांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातूंवर दबाव निर्माण झाला आहे.
याशिवाय, 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget 2026) सोने-चांदीवरील आयात शुल्क (Import Duty) कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपेक्षेमुळेही ट्रेडर्सकडून मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली. बाजार तज्ज्ञांच्या मते, बजेटपूर्व अस्थिरता काही काळ कायम राहू शकते. लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही घसरण संधी ठरू शकते, मात्र गुंतवणूकदारांनी पुढील दिशा ठरवण्यासाठी बजेटमधील घोषणांकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.
हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानाचा वैमानिक ऐनवेळी का बदलला? धक्कादायक माहिती समोर