Saturday, January 24, 2026 03:15:03 AM

Pune MHADA Lottery 2025: घर खरेदीसाठी पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 4186 घरांची सोडत अंतिम टप्प्यात

दोन लाखांहून अधिक अर्जांची पडताळणी सुरू असल्याने सोडत काही दिवसांनी पुढे ढकलावी लागली असून, ती 16 किंवा 17 डिसेंबरला घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

pune mhada lottery 2025 घर खरेदीसाठी पुणेकरांसाठी सुवर्णसंधी 4186 घरांची सोडत अंतिम टप्प्यात

Pune MHADA Lottery 2025: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) सुमारे 4,400 घरांसाठीच्या सोडतीची तयारी आता निर्णायक टप्प्यात आली आहे. दोन लाखांहून अधिक अर्जांची पडताळणी सुरू असल्याने सोडत काही दिवसांनी पुढे ढकलावी लागली असून, ती 16 किंवा 17 डिसेंबरला घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. आचारसंहिता लागू झाल्यास सोडत करण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेण्याची तयारीही सुरू असून, सोडत जाहीर करताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले जाणार आहे.

दोन लाखांहून अधिक अर्ज; पडताळणीमुळे उशीर

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 11 सप्टेंबरला सुरू झाली होती. नागरिकांच्या विनंतीनुसार अंतिम मुदत दोन वेळा वाढवून 30 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली. या कालावधीत 2,15,847 अर्ज जमा झाले. प्रत्येक अर्जासोबत 708 रुपये शुल्क आणि 20,000 रुपयांची अनामत रक्कम अपेक्षित होती. अशाप्रकारे अर्जदारांकडून एकूण 446.97 कोटी रुपये म्हाडाकडे जमा झाले आहेत. अर्जांची संख्या अपेक्षेपेक्षा मोठी असल्याने, आणि विविध आरक्षणांनुसार पडताळणीची प्रक्रिया सखोलपणे सुरू असल्याने सोडतीची तारीख पुढे ढकलावी लागल्याचे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले. ही पडताळणी शनिवारपर्यंत चालणार आहे.

हेही वाचा - Mumbai Latest News : मुंबईकरांचं घराचं स्वप्न साकार होणार, प्रत्येक पात्र नागरिकाला घर मिळणार; सरकारची ग्वाही

दरम्यान, मूळ नियोजनानुसार 11 डिसेंबर रोजी सोडत जाहीर करण्याची तयारी होती. मात्र विक्रमी अर्जसंख्येमुळे पडताळणीला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत असल्याने म्हाडाने नवीन तारखांचा विचार सुरू केला आहे. पडताळणी पूर्ण होताच 16 किंवा 17 डिसेंबर रोजी लकी ड्रॉ घेण्यासाठी अंतिम तयारी केली जाणार आहे.

हेही वाचा - Vasant More: पुण्यातील ‘मृत्यूचा सापळा’ नवले पूल; लाईव्हदरम्यान वसंत मोरे थोडक्यात वाचले

आचारसंहितेची शक्यता आणि पुढील पाऊल

पुढील आठवड्यात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, सोडतीवर निर्बंध येऊ शकतात. मात्र ही नागरिकांच्या हिताची प्रक्रिया असल्याने, आवश्यक असल्यास निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी घेऊन सोडत जाहीर करण्यात येईल, असेही आढळराव यांनी सांगितले. पडताळणी पूर्ण होताच म्हाडा पुढील पावले उचलणार असून, पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर घरांची संधी देणारी ही सोडत आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.


सम्बन्धित सामग्री