Jalgaon-Delhi Flight : जळगावच्या विमान वाहतुकीच्या इतिहासात 2 मे हा दिवस सुवर्णक्षरांनी लिहिला जाणारा ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली गाठण्यासाठी रेल्वेचा तासन्तास प्रवास करणाऱ्या जळगावकरांचे स्वप्न आता प्रत्यक्षात येत आहे. 'अलायन्स एअर' (Alliance Air) कंपनीच्या माध्यमातून जळगाव आता थेट देशाची राजधानी दिल्ली आणि मध्य प्रदेशातील इंदूर या शहरांशी हवाई मार्गाने जोडले जाणार आहे. यामुळे खान्देशातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
असे असेल विमानाचे वेळापत्रक
'अलायन्स एअर'कडून सुरू होणारी ही दिल्ली-इंदूर-जळगाव विमानसेवा आठवड्यातून 3 दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी उपलब्ध असेल. कंपनीने या मार्गासाठी ATR 72 या विमानाची नियुक्ती केली आहे. या प्रवासासाठीच्या तिकीट विक्रीला गुरुवार रात्रीपासूनच सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना आता आगाऊ बुकिंग करता येईल.
जळगाव आता 'कनेक्टेड' सिटी
या नवीन विमानसेवेमुळे जळगाव विमानतळ आता देशातील 7 मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडले गेले आहे. सध्या जळगाव विमानतळावरून खालीलप्रमाणे विमानसेवा सुरू आहेत:
फ्लाय 91 (Fly91): गोवा, पुणे आणि हैदराबाद.
अलायन्स एअर (Alliance Air): मुंबई, अहमदाबाद आणि आता नव्याने दिल्ली व इंदूर.
हेही वाचा - Land And Property Rules: महिलेच्या निधनानंतर तिच्या संपत्तीवर खरा अधिकार कुणाचा? दावा फेटाळत उच्च न्यायालयाने दिला 'हा' ऐतिहासिक निकाल
वेळेची मोठी बचत आणि व्यापाराला गती
रेल्वेने जळगाव ते दिल्ली हे 1100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना 13 ते 17 तास खर्च करावे लागतात. आता विमानसेवेमुळे हा प्रवास अवघ्या 2 ते 3 तासांत पूर्ण होईल. या विमानसेवेचे अनेक फायदे जळगावकरांना मिळतील. कापूस, केळी आणि धान्याची मोठी बाजारपेठ असलेल्या जळगावच्या अर्थव्यवस्थेला राजधानी दिल्लीशी थेट जोडल्यामुळे मोठी उभारी मिळेल. दरम्यान, विद्यार्थी आणि पर्यटकांना आता मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगरला न जाता थेट जळगावातूनच प्रवास करणे शक्य होईल. जळगाव विमानतळाला प्रवाशांचा मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा थेट देशाच्या राजधानीशी जोडला गेल्याने जिल्ह्याच्या विकासाचे नवे दालन खुले झाले असून, सर्व स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.