कल्याण: कल्याणमधील सरकारी इमारतच धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे. भावे सभागृह धोकादायक असूनही सरकारी कामं सुरुच आहेत. त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांचा जीव धोक्यात सापडला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 'ह' प्रभागक्षेत्र अंतर्गत असलेली भावे सभागृह इमारत धोकादायक आहे. या इमारतीत महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे तलाठी कार्यालय आहे. भावे सभागृह इमारत धोकादायक असल्याने येथील कर्मचारी जीव मुठीत धरून कामकाज करत आहेत. आमचे कार्यालय दुसरीकडे चांगल्या ठिकाणी स्थलांतर करावे अशी मागणी येथील कर्मचारी करत आहे. याबाबत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे हे लवकरच महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत.
हेही वाचा : Today's Horoscope: आजच्या दिवशी काही राशींना कामाची जबाबदारी मिळेल तर काहींना वारसा लाभ, जाणून घ्या
कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत हजारोंच्या संख्येने धोकादायक इमारती आहेत. यामध्ये काही शासकीय व पालिकेच्या इमारतींचा समावेश आहे. पालिका आयुक्त कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून खाजगी धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी तत्पर आहेत. मात्र शासकीय व पालिकेच्या इमारतीबाबत काळजी घेतल्याचे दिसून येत नाही असे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे यांनी सांगितले आहे.
कल्याणमधील सप्तश्रुंगी इमारतीचा स्लॅप कोसळून सहा जणांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले होते. 21 मे ला घडलेल्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली. तसेच अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यास सुरुवात केली आहे. आश्चर्य म्हणजे सरकारी इमारत धोकादायक असून आजही त्या इमारतीत सरकारी कामे सुरु असून कामानिमित्त नागरिक येत जात असतात. तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पालिका प्रशासनाला डोंबिवली पश्चिमेकडील पु. भा. भावे सभागृह असलेल्या अतिधोकादायक इमारतीमधील मंडळ अधिकारी ठाकुर्ली कार्यालय आणि तलाठी कार्यालय असून सदर कार्यालय इतरत्र स्थलांतर करण्याकरता पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी असे पत्र दिले आहे. महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव संतोष केणे, प्रणव केणे आणि राहुल केणे यांनी सदर 'ग' इमारतीची पाहणी करून मंडळ अधिकारी रविंद्र जमदारे व तलाठी कासार यांची भेट घेतली.