Monday, June 23, 2025 12:47:00 PM

'संजय राऊत पांढऱ्या पायाचे आहेत; जिथे जातात तिथे शिवसेना संपते' गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल

चोपडा तालुक्यातील दुर्दैवी प्रसूतीवरून संजय राऊतांनी सरकारवर टीका केली; त्यावर गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, निवडणुकीत राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता.

संजय राऊत पांढऱ्या पायाचे आहेत जिथे जातात तिथे शिवसेना संपते  गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल

जळगाव: चोपडा तालुक्यात एका महिलेला रस्त्यावर प्रसूती करावी लागल्याच्या दुर्दैवी घटनेवरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत राऊतांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

गुलाबराव पाटील म्हणाले, 'ही घटना खरोखरच दुर्दैवी आहे, आणि आम्ही आजही ती मान्य करतो. मात्र, याचा अर्थ असा नाही की संपूर्ण प्रशासन किंवा यंत्रणा कुचकामी ठरली आहे. अपवादात्मक घटना घडतात, पण त्यावरून राज्य सरकार आणि पालकमंत्र्यांची बदनामी करणे योग्य नाही.'

संजय राऊत यांच्या विधानांवर टीका करताना पाटील म्हणाले, 'जिल्ह्यात गद्दारांना मी पाडेल अशी भाषा करत राऊत विधानसभा निवडणुकीच्या काळात जळगावात आले होते. मात्र, यांना जळगावात उमेदवारच सापडला नाही. जे मिळाले, ते हरले. हे त्यांचं अपयश स्पष्ट करतं. आता महापालिका निवडणुकीत हे महारथी काय करणार, हे बघणं औत्सुक्याचं ठरेल.'

हेही वाचा: देशभरात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; केरळ, महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण

ते पुढे म्हणाले, 'आज त्यांच्या आजूबाजूचेच कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत जशी आले तसे काळ्या तोंडाने परत जातील. संजय राऊत पांढऱ्या पायाचे आहेत. जिथे जातात तिथे शिवसेना संपते. जळगावही त्यांनी अशा अवस्थेत आणले आहे.'

विधानसभा निवडणुकीतील निकालांबाबत बोलताना पाटील म्हणाले, 'संजय राऊत यांनी त्या वेळी मोठमोठ्या घोषणा दिल्या, पण निकाल पैसे, ईव्हीएम घोटाळा, ईडी, सीबीआयच्या कथित गैरवापरावरून लागले अशी विधाने करत आहेत. हे सगळं स्वतःच्या पराभवाचं खापर दुसऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न आहे.'

सुरेश दादा जैन यांच्यासोबत संजय राऊतांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, 'सुरेश दादा यांनी आता सर्व राजकारण बाजूला ठेवलं आहे. ते जे योग्य आहे त्याच्यासोबत राहतात. राऊत कितीही लाड्या लुबड्या करोत, काही उपयोग होणार नाही. सुरेश दादा हे आमचेही ज्येष्ठ नेते आहेत.'

आगामी निवडणुकांबाबत बोलताना पाटील यांनी स्पष्ट केलं की, 'महायुती म्हणून निवडणुकीत उतरण्याचा आमचा विचार आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील, तसतसे निर्णय घेतले जातील. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महायुती सक्षम आहे.'

या सगळ्या वक्तव्यांवरून जळगाव जिल्ह्यात आगामी राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री