Sunday, June 15, 2025 11:49:01 AM

'फिक्सिंगचा आरोप म्हणजे मतदारांचा अपमान'; गुलाबराव पाटील यांचा राहुल गांधींना टोला

गुलाबराव पाटील यांनी राहुल गांधींच्या 'फिक्सिंग' आरोपांना प्रत्युत्तर देताना मतदारांचा अपमान झाल्याचं सांगितलं. हार स्वीकारणं हे नेत्याचं मोठेपण असून, दुटप्पी भूमिका चालत नाही.

फिक्सिंगचा आरोप म्हणजे मतदारांचा अपमान गुलाबराव पाटील यांचा राहुल गांधींना टोला

जळगाव: राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांवर 'फिक्सिंग'चा आरोप करत जनतेच्या कौलावर शंका उपस्थित केली होती. या वक्तव्यावर जलसंपदामंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'फिक्सिंगच्या नावाखाली मतदारांचा अपमान केला जात आहे. हार पचवण्याची ताकद प्रत्येक नेत्यात असावी,' असं त्यांनी स्पष्ट केलं.

गुलाबराव पाटील म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीत आमच्या 17 जागा निवडून आल्या होत्या आणि त्यांच्या 31. तेव्हा फिक्सिंग नव्हतं का? विधानसभेत आमच्या महायुतीला 200 पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तेव्हा मात्र आरोप सुरू झाले. म्हणजे आपल्या बाजूने निकाल लागला की सर्व काही योग्य आणि विरोधक जिंकल्यास फिक्सिंग? ही दुटप्पी भूमिका जनतेला खटकणारी आहे.'

हेही वाचा: 'नितेशने जपून बोलावे... मी भेटल्यावर...'; नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानावर निलेश राणे काय म्हणाले?

पाटील यांनी पुढे सांगितलं की, 'मतदार मतदान करताना पक्ष किंवा व्यक्ती न पाहता त्यांचे काम, विकास आणि जनहिताचं काम पाहतो. पूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला संधी दिली गेली, नंतर भाजप-शिवसेनेला. त्यानंतर सलग पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं. म्हणजेच जनतेच्या मनाचा कौल बदलतो. पण त्यामुळे कोणताही निकाल फिक्सिंगमुळे लागतो, हे मान्य करणं चुकीचं आहे.'

ते पुढे म्हणाले, 'मी स्वतः सहा निवडणुका लढलोय. त्यापैकी पाच वेळा जिंकलो आणि एक वेळेस हरलो. मी हरलो तेव्हा मी देखील असंच म्हणायला हवं होतं का, की फिक्सिंग झालं? हार म्हणजे हार, ती स्वीकारण्याची मोठेपणाची गरज असते.'

हेही वाचा: डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यातले संबंध संपले?

राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर टीका करताना पाटील म्हणाले, 'यावेळी काँग्रेसचे 100 खासदार निवडून आले आहेत. मागच्या वेळेस त्यांचं विरोधी पक्षनेतेपदही मिळालं नव्हतं. तेव्हा फिक्सिंग नव्हतं का? आज फक्त भाजप जास्त जागा मिळवल्या म्हणून आरोप करणं चुकीचं आहे. यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि त्याचा राग मतदार पुढच्या निवडणुकांमध्ये दाखवतो.'

दरम्यान, गजानन कीर्तिकर यांनी दिलेल्या 'दोन्ही ठाकरे एकत्र यावेत' या वक्तव्यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 'ही कीर्तिकर यांची वैयक्तिक मते आहेत. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा निर्णय अंतिम मानतो. कोणी काय बोलतं यावर आमचं लक्ष नसून, आमचे शिंदे काय म्हणतात हे आम्हाला महत्त्वाचं वाटतं.'


सम्बन्धित सामग्री