ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात आज प्रथमच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहेत. शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांच्या महायुतीचा हा 'ग्रँड शो' गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या चौकात सायंकाळी पाच वाजता पार पडणार असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या 'ठाकरी तोफे'कडे लागले आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर ठाणे शहर पूर्णपणे शिंदे गटाच्या ताब्यात गेले असले तरी, राजन विचारे (शिवसेना उबाठा), अविनाश जाधव (मनसे) आणि जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी शप) या त्रिकुटाने प्रशासकीय अनागोंदी आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात रान पेटवले आहे. या सभेच्या निमंत्रण पत्रिकेवर केवळ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असून 'मराठी जनांना आग्रहाचे निमंत्रण' ही टॅगलाईन चर्चेचा विषय ठरली आहे. सत्तेतील बंडाचा केंद्रबिंदू ठाण्यातच असल्याने दोन्ही नेते आज शिंदे गटावर नेमका काय हल्ला चढवतात, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ठाणे महापालिकेतील लाचखोरी प्रकरण, रखडलेले पायाभूत सोयीसुविधांचे प्रकल्प आणि शहराचा श्वास कोंडणारी वाहतूककोंडी या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. या महायुतीमुळे ठाण्यातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली असून, 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी ही सभा मतदारांना आकर्षित करण्यासाठी निर्णायक ठरू शकते.
ही सभा मोकळ्या मैदानात न होता थेट गडकरी रंगायतन चौकात रस्त्यावर होणार असल्याने ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव स्टेशन परिसरातून सुटणाऱ्या बस, रिक्षा आणि खासगी वाहनांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. ऐन सायंकाळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूककोंडीचा मोठा फटका बसण्याची भीती वर्तवण्यात येत असून पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला आहे. ही सभा केवळ निवडणुकीचा प्रचार नसून, 'ठाणे कोणाचे?' या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी केलेले शक्तिप्रदर्शन मानले जात आहे. राज आणि उद्धव ठाकरेंची ही ऐतिहासिक साथ ठाण्याच्या राजकारणात नवं वळण आणणार का, हे काही दिवसात स्पष्ट होईल.