MIM Matin Patel House : नाशिकच्या बहुचर्चित धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा ठपका असलेले एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल यांना प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. पटेल यांनी निदा खानला ज्या घरात लपवून ठेवले होते, ते अनधिकृत घर महापालिकेने बुधवारी पहाटेच जमीनदोस्त केले.
24 तासांची नोटीस आणि थेट कारवाई
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मतीन पटेल यांच्या कौसर पार्क येथील निवासस्थानावर आणि नारेगावमधील कार्यालयावर मंगळवारी 24 तासांची अंतिम नोटीस बजावली होती. यापूर्वी दिलेली तीन दिवसांची मुदत संपल्यानंतर पटेल यांनी 15 दिवसांच्या वाढीव वेळेची मागणी केली होती, जी प्रशासनाने फेटाळून लावली. मालमत्तेची अधिकृत कागदपत्रे सादर करण्यात अपयशी ठरल्याने, बुधवारी सकाळीच महापालिकेचे पथक बुलडोझरसह घटनास्थळी दाखल झाले आणि अनधिकृत बांधकाम पाडले.
न्यायालयाकडून दिलासा नाही
या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी मतीन पटेल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, सुनावणीदरम्यान खंडपीठाने महापालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. महापालिकेने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच ही मोहीम राबवल्याचे न्यायालयात स्पष्ट केले.
राजकीय सूडबुद्धीचा आरोप
दुसरीकडे, मतीन पटेल यांनी ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून केली जात असल्याचा दावा केला आहे. “केवळ तीन दिवसांची नोटीस देणे हे नियमांच्या विरुद्ध आहे, प्रशासनाने सात दिवसांचा अवधी द्यायला हवा होता,” असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. मात्र, प्रशासनाने निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ही धडक कारवाई पूर्ण केली.
काय आहे प्रकरण?
नाशिक येथील टीसीएस (TCS) प्रकरणाशी संबंधित संशयित आरोपी निदा खान हिला लपवून ठेवल्याप्रकरणी मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या तपासानंतरच त्यांच्या बेकायदा बांधकामांचा मुद्दा समोर आला आणि महापालिकेने हे पाऊल उचलले.