Friday, July 11, 2025 11:21:11 PM

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा कहर; तुमच्या जिल्ह्याला कुठला अलर्ट आहे? जाणून घ्या

महाराष्ट्रात पावसाने जोर धरला असून मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांना यलो, ऑरेंज व रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

maharashtra rain alert राज्यात पावसाचा कहर तुमच्या जिल्ह्याला कुठला अलर्ट आहे जाणून घ्या

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरले असून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतो आहे. गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली असली, तरी मुंबईत पावसाने उशिरा हजेरी लावली. मात्र रविवारी संध्याकाळपासून मुंबईसह ठाणे, वसई, कल्याण परिसरात पावसाचा जोर वाढू लागला आहे.

सोमवारी सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने याचा पूर्वानुमान वर्तवलेला होता आणि तो खरा ठरला आहे. या पावसामुळे काही भागांत सखल क्षेत्रांत पाणी साचले असले, तरी मुंबईतील लोकल सेवा मोठ्या अडथळ्यांशिवाय सुरु आहे. केवळ काही मार्गांवर 5 ते 10 मिनिटांचा उशीर होत आहे.

हेही वाचा: Mumbai IMD Weather Alert: मुंबईत पावसाचा कहर; कोणते रस्ते जलमय? लोकल ट्रेन चालू आहेत का? सविस्तर वाचा

वसई-विरार परिसरात रविवारी संध्याकाळपासूनच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवनही काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे.

हवामान खात्याने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, आहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासोबत वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला असून त्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये अद्याप कोणताही अलर्ट जारी नसला तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Mumbai IMD Weather Alert: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, IMD कडून ऑरेंज अलर्ट

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, जालना, नांदेड, धाराशिव, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला गेला आहे. तर विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून त्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे प्रशासन सजग झाले आहे. नागरिकांनी अधिकृत सूचना लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री