Heavy Rainfall Warning: देशभरात मान्सून पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सक्रिय झाला असून पुढील 24 तासांत उत्तर, मध्य, ईशान्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीवर धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार तब्बल 25 हून अधिक राज्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
'या' राज्यांना रेड अलर्ट; हवेतील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर वाढला
हवामान खात्याने आसाम आणि मेघालय या ईशान्येकडील राज्यांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सध्या अनूपगड ते नागालँड असा पसरलेला मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा, तसेच विविध राज्यांवर तयार झालेली चक्रीवादळाची स्थिती आणि सक्रीय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पावसाची तीव्रता आणखी वाढली आहे. परिणामी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, ओडिशा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पूर आणि भूस्खलनाचा धोका!
उत्तर भारतात पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागात ढगफुटीसदृश पाऊस, भूस्खलन आणि अचानक पूर येण्याचा गंभीर धोका आहे. यामुळे चारधाम यात्रेकरूंना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, ज्यामुळे सखल भागात पाणी साचून वाहतूक कोंडी होऊ शकते.
महाराष्ट्रात कोकण अन् मध्य महाराष्ट्राला अलर्ट; विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस
महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार असून कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळतील. तर मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे तसेच झाडांखाली किंवा मोकळ्या जागेत उभे राहू नये, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.