राज्यात बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. असं असताना मुंबईत रविवारी अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली असून शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम, तर काही भागांत जोरदार सरी कोसळल्या आहेत.
यावेळी अंधेरी, वांद्रे, विलेपार्ले, दादर आणि मध्य उपनगरात पावसाने चांगलचं झोडपून काढलं आहे. तसेच पश्चिम उपनगर आणि मध्य उपनगरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तावण्यात आली आहे. दरम्यान हवामान विभागाकडून मुंबईसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक असल्याशिवाय बाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन. सखल भागात पाणी साचण्याची आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्यांत पावसाचा जोर कमी असल्याने या विभागातील कोणत्याही जिल्ह्यासाठी अलर्ट देण्यात आलेला नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. यामुळे तापमानात लक्षणीय घट होऊन उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. काही काल ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा हजेरी लावलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळाला असला तरी दमदार पावसाअभावी चिंता कायम आहे. यावेळी हवामान विभागाचा विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांसाठी पुढील 4 ते 5 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तावण्यात आला आहे. यावेळी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची तीव्रता वाढल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे, तर पुढील काही दिवस हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.