Satara Crime : प्रेमसंबंध, सूड आणि क्रूरतेचा थरार फलटण तालुक्यात पाहायला मिळाला आहे. एका 27 वर्षीय तरुणाला त्याच्याच प्रेयसीने पती आणि दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने संपवलं. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून ते नदी आणि तलावात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमंथळी येथील सतीश उर्फ आप्पा गडस हा तरुण 14 जानेवारीपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेऊनही तो न सापडल्याने 21 जानेवारीला त्याच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता, सतीशच्या प्रेमसंबंधांतून हा प्रकार घडल्याचे समोर आले.
हत्त्येचा कट: पत्नी, पती आणि पहिला प्रियकर एकत्र
तपासात समोर आलेली माहिती चित्रपटालाही लाजवेल अशी आहे. सतीशचे ज्या विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते, तिचे आधीपासूनच सतीश माने नावाच्या दुसऱ्या तरुणाशीही संबंध होते. सतीश गडस हा त्या महिलेवर सतत दबाव टाकत असल्याने ती वैतागली होती. अखेर तिने स्वतःचा पती लखन बुधावले आणि पहिला प्रियकर सतीश माने यांच्यासोबत मिळून सतीशला संपवण्याचा कट रचला.
हेही वाचा - Crime News : पत्नीचं भयंकर षडयंत्र! प्रियकराच्या मदतीने पतीला अडकवलं गोहत्येच्या खोट्या गुन्ह्यात
मृतदेहाचे तुकडे
दरम्यान, मकरसंक्रांतीच्या दिवशी वादावादी झाल्यानंतर आरोपींनी सतीशवर रॉडने हल्ला केला. जखमी सतीशला उपचार देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून निर्जनस्थळी नेले आणि तिथे डोक्यात दगड घालून त्याला संपवण्यात आलं. तथापी हे कृत्य केल्यानंतर आरोपींनी लाकूड कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेहाचे अवशेष दोन पोत्यात भरून एक पोते नीरा नदीत तर दुसरे साठे गावातील तलावात फेकून दिले.
पोलिसांची कारवाई
सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तिन्ही आरोपींनी पोलिसी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी सतीशचा मृत्यू आणि पुरावे नष्ट केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने नदीपात्रातून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.