Wednesday, July 09, 2025 08:38:46 PM

नवी मुंबई वाशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस; शव गुंडाळण्यासाठी दोन हजारांची मागणी

वाशी रुग्णालयातील शवगृहात तरुणीच्या मृतदेहासाठी कर्मचाऱ्याने 2 हजारांची लाच घेतल्याचा प्रकार समोर आला. हा व्हिडिओ व्हायरल होताच संताप उसळला असून, दोषींवर कारवाईची जोरदार मागणी होतेय.

नवी मुंबई वाशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस शव गुंडाळण्यासाठी दोन हजारांची मागणी

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयातील शवागृहात घडलेला एक अमानवी व लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. एका २३ वर्षीय तरुणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक मृतदेह ताब्यात घेत असताना, शवगृहातील कर्मचाऱ्याने "कपडे व्यवस्थित गुंडाळतो" या कारणावरून तब्बल 2 हजार रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून यावरून गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

ही तरुणी एक आयटी कंपनीत काम करत होती. ऐरोलीतील पेइंग गेस्ट निवासस्थानी तिने आत्महत्या केली. तिचे मूळ घर उत्तर प्रदेशातील कानपूर येथे असून मृत्यूची बातमी मिळताच कुटुंबीय तातडीने नवी मुंबईत दाखल झाले. मृतदेह घेऊन मायभूमीकडे निघण्याच्या तयारीत असतानाच त्यांना शवगृह कर्मचाऱ्यांकडून आर्थिक छळाचा सामना करावा लागला.

सुरुवातीला हजार रुपये मागणाऱ्या कर्मचाऱ्याने मागणी वाढवून दोन हजार रुपये घेतले. या व्यवहाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक वेळा अशा गोष्टी केवळ कानोकानी समजत असतात, मात्र या घटनेचा व्हिज्युअल पुरावा उपलब्ध असल्याने प्रशासनाकडून कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे. रुग्णालय प्रशासनावर, तसेच महापालिकेवरही याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याचा दबाव निर्माण झाला आहे.

मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी शवगृह कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'मुलीच्या मृत्यूने आधीच आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. त्यावरही ही आर्थिक लूट म्हणजे अमानुषतेचा कळस आहे,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हा प्रकार म्हणजे सार्वजनिक रुग्णालयांतील भ्रष्टाचाराचा एक नमुना आहे. जेथे गरजू आणि शोकग्रस्त लोक आधार शोधत येतात, तिथेच त्यांच्याकडून पैशांची जबरदस्तीने वसुली केली जात असल्याचं दिसून येत आहे.

या घटनेमुळे नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई होणे अत्यावश्यक बनले आहे. सामाजिक संस्था आणि नागरीक देखील या प्रकरणाकडे लक्ष वेधून अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करत आहेत.

या अमानुष आणि लज्जास्पद घटनेने संपूर्ण शहरात संतापाची भावना आहे. प्रशासनाने वेळकाढूपणा न करता तात्काळ चौकशी सुरू करावी आणि दोषींवर कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे.


सम्बन्धित सामग्री