Sunday, July 13, 2025 10:11:39 AM

'स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 राबविणार'

पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवित आहे.

स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 60 राबविणार

मुंबई: पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवित आहे. राज्यस्तरावर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्यानंतर आता 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत ‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

निसर्गाच्या भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचमहाभूतांवर लक्ष केंद्रीत करून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यास सुरूवात करण्यात आली. निसर्गाच्या पंचतत्वावर आधारित संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध शासकीय योजना, कार्यक्रम, उपाययोजना एकत्रित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्या प्रभावीपणे व मिशनमोड पद्धतीने राबविण्यासाठी अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत पाच टप्प्यात माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी झाली आहे.

हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar: ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील मायलेकीचा मृत्यू

राज्यातील 28,317 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अंमलबजावणी होणार 

माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थानिक संस्थांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अमंलबजावणीनंतर ‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत नोंदणी केलेल्या 422 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व 27,895 ग्रामपंचायती अशा एकूण 28,317 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकसंख्या निहाय गट करून स्पर्धा घेण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) तयार करण्यात आला असून त्यावर 15 जुलै 2025 पर्यंत अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्या सूचनांचा विचार करून अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) अंतिम करण्यात येणार आहे.

त्रयस्थ यंत्रणेद्वारे होणार कामांचे मूल्यांकन

या अभियानाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांनी पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर केलेल्या कामांचे मूल्यमापन करून गुणांकन दिले जाणार आहे. यामध्ये अमृत गटासाठी 15,125 व अमृत गट वगळून इतर नागरी संस्थांच्या गटांसाठी 14,625 आणि ग्रामपंचायतीसाठी 13,625 गुण ठेवण्यात आले आहे. त्रयस्थ यंत्रणेद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामांचे मूल्यांकन करून पुढील वर्षी 5 जून 2026 रोजी निकाल जाहीर करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

कार्बन पृथक्करण, हरित वायूचे उत्सर्जन कमी करणे आणि नागरिकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करणे या बाबींवर लक्ष केंद्रीत करून या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी नोंदणी करावी. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आयुक्त, मुख्याधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक आदींनी माझी वसुंधरा अभियान 6.0 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.
 


सम्बन्धित सामग्री