Wednesday, February 18, 2026 06:11:16 PM

Sujay Vikhe-Patil : 'कायदा जर कुणी हातात घेणार असेल तर आम्ही...'; सुजय विखे यांचा विरोधकांना कडक शब्दांत इशारा

प्रभाग क्रमांक 15 सह विविध भागांत भाजप आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.

sujay vikhe-patil  कायदा जर कुणी हातात घेणार असेल तर आम्ही सुजय विखे यांचा विरोधकांना कडक शब्दांत इशारा

Sujay Vikhe-Patil : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी शहरात राजकीय हिंसाचाराने उग्र रूप धारण केले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 15 सह विविध भागांत भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली असून, यामध्ये 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. 'पराभव समोर दिसत असल्याने विरोधक आता उमेदवारांच्या कुटुंबांवर आणि कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहेत. जर कोणी कायदा हातात घेणार असेल, तर आम्ही देखील शांत बसणार नाही,' असा इशारा सुजय विखे यांनी दिला आहे. 

दरम्यान, सुजय विखे यांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणी तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कायदा जर कुणी हातात घेणार असेल तर आम्ही देखील शांत बसणार नाही. उमेदवारांच्या कुटुंबांवर हल्ले होत असल्याचा आरोप करत, प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यांनी म्हटलं, की, प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपच्या उमेदवारांवर हल्ला करण्यात आला. पराभव पुढे दिसत असल्या कारणामुळे विरोधी पक्षातील उमेदवार भाजप उमेदवारांवर हल्ले करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करत तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला निवडणुका शांततेत पार पाडायच्या आहेत, आणि जर कोणी कायदा हातात घेत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

हेही वाचा - Dhule Crime : धुळ्यात मतदानापूर्वी राडा, शिवसेना उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर हल्ला; भाजपवर गंभीर आरोप

दुसरीकडे, या हिंसाचारामुळे अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून पैशांच्या वाटपाच्या वादातून आणि पक्षीय संघर्षातून ही हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या संघर्षात सिद्धांत देवकर, आर्यन एकाडे, स्वाती गाडळकर, अभिजित दळवी आणि हिमांशु जाधव हे पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा - Devendra Fadnavis : 'मशिदींवर लाऊडस्पीकर लावणे, हाच उबाठाचा...', देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

दरम्यान, या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी सत्ताधाऱ्यांवर पोलीस दडपशाहीचा आरोप केला आहे. मार खाणाऱ्यांवरच गुन्हे दाखल केले जात असून पोलिसांचा गैरवापर होत आहे, या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, असा पवित्रा लंके यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे, शिंदे गटाचे नेते संजीव भोर यांनीही कोतवाली पोलीस ठाण्यावर गंभीर आरोप करत आपल्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचे म्हटले आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे उद्या होणाऱ्या मतदानावेळी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 


सम्बन्धित सामग्री