Prakash Ambedkar On PM Modi: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि वाढत्या महागाईवर कडाडून टीका केली आहे. केंद्र सरकारने काल रात्री अचानक लागू केलेल्या कमोडिटी कायद्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला. “हे सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) राजकारणाचे परिणाम आहेत,” असे म्हणत त्यांनी थेट सरसंघचालक मोहन भागवत यांना जाब विचारला आहे.
परराष्ट्र धोरण आणि इंधन नाकेबंदीवर टीका
प्रकाश आंबेडकर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, जर भारताने इराणशी मैत्रीपूर्ण संबंध जपले असते, तर आज चीनप्रमाणे भारतालाही तेल मिळाले असते. मात्र, सध्याच्या सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे भारतावर जागतिक स्तरावर नाकेबंदी होण्याची वेळ आली आहे. “मी आधीच म्हटले होते की मार्च महिना सुरू होऊ द्या, सरकारच्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम समोर येतील,” असे सूचक विधानही त्यांनी केले. तसेच, पुढचा मोठा गोंधळ बँकिंग क्षेत्रात होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी हे खरोखरच RSS च्या रणनीतीप्रमाणे आणि नियमाप्रमाणे चालत आहेत का? जर ते RSS च्या विचाराप्रमाणे वागत नसतील, तर संघ त्यांचा राजीनामा का मागत नाही? देश संकटात असताना संघ यावर गप्प का आहे? या प्रश्नांच्या माध्यमातून आंबेडकरांनी सरकार आणि संघामधील समन्वयावर थेट निशाणा साधला आहे.
30 मार्च रोजी नागपुरात महामोर्चा
सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. “30 मार्च रोजी मी स्वतः काँग्रेस आणि इतर सहकाऱ्यांसह नागपुरात असेन. आम्ही RSS कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करू,” असे त्यांनी जाहीर केले. ज्या सामान्य नागरिकांना आणि गरीबांना सरकारच्या या धोरणांमुळे वेदना सहन कराव्या लागत आहेत, त्यांच्यासाठी हा लढा असल्याचे त्यांनी सांगितले. कमोडिटी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.